२४ तासांत २० नवे करोनाबाधित रुग्ण; वर्तकनगर, उथळसर, माजीवडा आणि मानपाडामध्ये सर्वाधिक

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात बुधवारी रात्रीपर्यंत १०१ करोनाबाधित रुग्णांची नोंद आढळून आली आहे. अवघ्या २४ तासांत ठाण्यात २० नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने ८१ असलेला आकडा थेट १०१ इतका झालेला आहे. यामध्ये वर्तकनगर, उथळसर आणि माजीवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद आढळून आली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात करोनाबाधितांचा आकडा वाढत असून ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांच्या रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ होत आहे. बुधवारी रात्रीपर्यंत जिल्ह्य़ात २७३ करोनाबाधित रुग्णांपैकी १०१ रुग्ण हे फक्त ठाणे महापालिका क्षेत्रात आढळून आले आहेत. हा आकडा इतर महापालिकेच्या तुलनेत सर्वाधिक आहे. ठाणे महापालिकेकडून यासाठी आता ठिकठिकाणी कारवाया करण्यात येत असून शहरातील अनेक भाग, गल्लीबोळ महापालिकेने प्रवेश बंद केलेला आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असल्या तरी, नागरिकांकडून बाहेर ये-जा सुरू असल्याने हा आकडा वाढतच असल्याचे चित्र आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत ८१ असलेला करोनाबाधितांचा आकडा थेट आता १०१ इतका झालेला आहे. पूर्वी महापालिका क्षेत्रातील कळवा-मुंब्रा या शहरात करोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक होता. मात्र, आता वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीतील आकडा सर्वाधिक झाल्याचे महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. तर, जिल्ह्य़ांत करोनाबाधितांचा आकडा २७३ इतका झाला असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झालेला आहे.

१२ रुग्ण करोनामुक्त

ठाणे, कळवा आणि मुंब्रा शहरात करोनाबाधितांचा आकडा वाढत असून त्याला आळा घालण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात औषध फवारणी, ताप बाह्य़रुग्ण विभाग, नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी सामाजिक अंतराची अंमलबजावणी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून ऑनलाइन व्हिडीओ कॉलद्वारे तपासणी, बाधित रुग्णांसाठी अलगीकरणाची प्रभावी यंत्रणा, योग्य उपचारपद्धती इत्यादी उपाययोजनांमुळे करोनाचा संसर्ग कमी होऊन बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता दिसून येत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १२ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. ठाण्यातील परिस्थिती समाधानकारक असून यापुढेही नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.

करोनाबाधितांची प्रभागनिहाय आकडेवारी

१) माजीवडा मानपाडा प्रभाग  समिती..                १८

२) वर्तकनगर प्रभाग समिती..                               २१

३)     लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती..       ६

४)     नौपाडा-कोपरी प्रभाग समिती..                        ५

५)     उथळसर प्रभाग समिती..                                ११

६)     वागळे प्रभाग समिती ..                                     ५

७)     कळवा प्रभाग समिती ..                                   १८

८)     मुंब्रा प्रभाग समिती..                                        १७

९)     दिवा प्रभाग समिती ..                                        ०

एकूण..                                                                     १०१