महापालिकेच्या वृक्ष छाटणीवर प्रश्नचिन्ह

ठाणे : शहरात गेल्या महिन्याभरात पावसामुळे १०० हून अधिक वृक्ष आणि पन्नासपेक्षा अधिक झाडांच्या फांदा उन्मळून पडल्या आहेत. या घटनांमुळे शहरातील अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आली. या प्रकारांमुळे यंदाही महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या वृक्ष छाटणीच्या कामांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

ठाणे शहरात गेल्या महिनाभरापासून पाऊस आणि सोसाटय़ाच्या वारा यामुळे वागळे ईस्टेट, वसंत विहार, मनिषा नगर, घोडबंदर, खारटनरोड, चिरागनगर या भागांसह शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. १ जुलै ते २८ जुलै या कालावधीत संपूर्ण शहरात १११ झाडे आणि ५९ फांद्या उन्मळून पडल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे. झाडे पडण्याच्या या घटनांमध्ये रस्त्यावरील वाहनांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. तसेच, मंगळवारी पाचपाखाडी परिसरात झाड पडून दोन दुकानांचे काही प्रमाणात नुकसान झाले. वर्षभरापूर्वी गोखले मार्गावर पदपथाजवळील झाड कोसळल्याने ५० वर्षीय पादचाऱ्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती. तसेच यंदाच्या वर्षी खारटन रोड येथे एका धावत्या रिक्षावर झाड पडल्याने रिक्षा चालकाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती.

दरवर्षी महापालिका प्रशासनातर्फे पावसाळ्यापूर्वी एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये करण्यात येणाऱ्या वृक्ष छाटणीच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असते. वृक्ष छाटणीचे काम योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे सोसाटय़ाचा वारा येताच वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार सातत्याने घडतात. गेल्या वर्षी देखील असे प्रकार मोठय़ा प्रमाणवर घडले होते. यावर तत्कालिन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. यंदाच्या वर्षी करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये महापालिका प्रशासन व्यग्र असल्यामुळे यावर्षी धोकादायक वृक्षाची छाटणी पुरेशा प्रमाणात झाली नाही, असा पर्यावरण प्रेमींचा आक्षेप आहे. दरम्यान याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण अधिकारी केदार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास टाळाटाळ केली.

या ठिकाणी धोकादायक झाडे

वागळे इस्टेट, चिराग नगर, नौपाडा, पाचपाखाडी, वसंत विहार, तळावपाळी, वर्तकनगर, माजीवडा, मानपाडा आणि  शास्त्रीनगर या ठिकाणी धोकादायक झाडे असल्याची नोंद ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे करण्यात आली आहे.