ठाणे : ठाणे शहरात शेअर रिक्षांमधून तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जात असून यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. शहरातील कळवा, बाळकूम, मुंब्रा आणि दिवा या भागांमध्ये अशी वाहतूक सुरू असल्याचे दिसून येते. करोनामुळे रिक्षामध्ये कमी प्रवासी बसत असल्याचे कारण पुढे करत काही रिक्षाचालकांनी प्रवास भाडय़ामध्येही १० ते १५ रुपयांची मनमानी वाढ केल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या  आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर एका रिक्षामधून केवळ दोन प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी ठाणे शहरातील शेअर रिक्षाचालक या नियमाचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत. रिक्षाचालक सध्या एका रिक्षामध्ये पुढे दोन प्रवासी आणि मागे तीन अशा पाच प्रवाशांची वाहतूक केली जाते. रिक्षात जास्त प्रवासी भरण्यात येत असल्याने अंतरसोवळ्याच्या नियमांना हरताळ फासला जात असून या प्रकारामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, शहरात असे प्रकार होत असल्यास तातडीने तपासणीच्या सूचना देण्यात येतील, असे ठाण्याच्या वायुवेग पथकाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी सांगितले.

करोनाच्या काळात रिक्षामध्ये अतिरिक्त प्रवासी भरले जात असल्याचा प्रकार गंभीर आहे. अशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

– बाळासाहेब पाटील, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे