मीरा-भाईंदरमध्ये सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण

ठाणे : करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यंदा ठाणे जिल्ह्य़ात ९९.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत २.६७ टक्क्यांनी निकालाचा टक्का वाढला आहे.

जिल्ह्य़ातील विविध भागांमधून यंदा १ लाख २४ हजार ९१ विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यापैकी १ लाख २३ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींसह मुलांचेही प्रमाण तितकेच असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्य़ात मीरा-भाईंदर शहरात सर्वाधिक म्हणजेच ९९.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर मीरा-भाईंदरपाठोपाठ नेहमीप्रमाणे ठाणे शहरातही उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.

ठाणे जिल्ह्य़ाचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक निकाल असल्याची माहिती जिल्हा परिषदेतर्फे देण्यात आली आहे. जिल्ह्य़ात ६६ हजार ३३४ विद्यार्थी (९९.२३ टक्के), तर ५६ हजार ८७४ विद्यार्थिनी (९९.३५ टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत.

श्रेणीनुसार निकाल

जिल्ह्य़ात यंदाच्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये विशेष श्रेणीतून ४० हजार ३३४, प्रथम श्रेणीतून ५३ हजार ८६८, द्वितीय श्रेणीतून २३ हजार ३६८ तर, तृतीय श्रेणीतून ५ हजार ६३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

करोनाच्या काळातही शाळांनी, मुख्याध्यापकांनी मूल्यांकनाचे काम उत्तम पार पाडले आहे. आतापर्यंतच्या कालावधीमध्ये यंदाचा निकाल हा सर्वाधिक लागला आहे.

– राजेश कंकाळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी, ठाणे जिल्हा.