ठाण्यातील आस्थापनांना सरासरीनुसार वीजदेयके; अनेक व्यापाऱ्यांना पाच हजारांपेक्षा अधिक देयके

ठाणे : करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. असे असले तरी महावितरणाने सर्वच दुकानांच्या वर्षभराच्या वीज वापराची सरासरी काढून एप्रिल महिन्याची वीज देयके पाठवली आहेत. टाळेबंदीत दुकाने बंद असतानाही ठाण्यातील दुकानदारांना पाच हजारांहून अधिक रकमेची देयके पाठवण्यात आली असून महावितरणाच्या या अजब कारभारामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातील वीजेच्या वापरानुसार देयके वसूल करण्यात यावी, अशी मागणी व्यापारी संघटनांनी महावितरणाकडे केली आहे.

करोना विषाणूचा संसर्ग देशात वाढू लागन्याने २३ मार्चपासून सर्वत्र टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या टाळेबंदीच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे दिड महिन्यापासून ठाण्याच्या बाजारपेठांमधील इतर सर्व दुकाने बंद आहेत. दुकाने बंद असल्याने ठाण्यातील व्यापाऱ्यांसमोर आर्थिच पेच निर्माण झाला असून अशा स्थितीत व्यापाऱ्यांना दुकानांमध्ये काम करणाऱ्या मजुरांनाही पगार द्यावा लागत आहे. असे असले तरी महावितणाच्या अजब कारभारामुळे ठाण्यातील व्यापाऱ्यांसमोर आता नवे आर्थिक संकट उभे राहीले आहे. टाळेबंदीच्या काळात मीटर रिडींग घेणे शक्य नसल्याने महावितरणाने वर्षभराच्या वीज वापरानुसार सरासरी एप्रिल महिन्याची वीज देयके आकारणी सुरु केली आहे. दुकाने बंद असणाऱ्या व्यापाऱ्यांना या सरासरी देयक आकारणीचा मोठा फटका बसला असून गेल्या महिन्यभरात वीजेचा कोणताही वापर केला नसला तरी व्यापाऱ्यांना ५ हजार ते ५० हजारापर्यंत वीज देयके महावितरणाकडून पाठवण्यात आली आहेत. अधिच व्यावसाय बंद असल्याने आर्थिक नुकसान होत असताना या वीज बिलांमुळे व्यापाऱ्यांपुढे आर्थिक पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ही वीज देयके मागे घेऊन वीज वापारानुसार देयके आकारावीत, अशी मागणी ठाणे सुभाष पथ व्यापारी वेल्फेअर असोसिएशनने महावितरणाकडे केली आहे. तसेच टाळेबंदीमुळे व्यापार ठप्प असल्याने ही वीज देयके भरताना उशीर झाल्यास दंड आकारू नये, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केली आहे.

वारंवार वीजपुरवठा खंडित

एकीकडे टाळेबंदीमुळे नागरिक घरात अडकून पडले असताना कळवा, मुंब्रा, दिवा, शीळडायघर या परिसरातील नागरिकांना वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठय़ामुळे घरात बसणे कठीण बनले आहे.  गेल्या १५ दिवसांपासून या भागांत वेळीअवेळी वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे या परिसरात विद्युत सेवा पुरवणाऱ्या टोरंट कंपनीच्या कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे नागरिक घरामध्ये आहेत. त्यातच उन्हाच्या झळा वाढू लागल्याने पंखा आणि एअर कंडीशनर (एसी), कुलरचा वापर वाढल्याने या भागातील वीजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे या भागात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. या तीनही भागातील वीज वाहीन्या जुन्या झाल्याने त्यात वारंवार बिघाड होतो. मात्र, टोरंट कंपनी या भागात नवीन असल्याने त्यांना भूमीगत विद्युत वाहीनीमधील बिघाड शोधण्यात अडचणी येतात. त्यामुळे वीज पुरवठा पुर्ववत होण्यास उशीर लागतो. त्यामुळे या भागातील नागरिकांना उन्हाळाच्या दिवसात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. असे कंपनीचे कर्मचारी सांगत आहेत.

सरासरी वीज देयकांचे समायोजन होणार

करोनाच्या काळात टाळेबंदी लागू केल्यामुळे महावितरण प्रशासनाने २३ मार्चपासून ग्राहकांचे मीटर रिडींग घेणे बंद केले आहे. त्यामुळे ग्राहकांनी वापर केलेल्या विजेनुसार देयक मिळवण्यासाठी त्यांच्या मीटरच्या रिडींगची संकेतस्थाळावर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून देयक मिळवावे, असे आवाहन महावितरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  रिडींग नोंदणी केली नसल्यास ग्राहकांना सरासरीनुसार देयके पाठवण्यात येत आहेत. असे असले तरी पुढील कालावधीत महावितरणातर्फे प्रत्यक्ष मीटर रिडींग घेतल्यानंतर अचूक वीज देयके आकारण्यात येणार आहेत.  तसेच नवीन वीज देयकांमधून मागील सरासरी वीज देयकांचे समायोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  तसेच महावितरणकडून मार्च महिन्याची देयके भरण्यासाठी १५ मे २०२० पर्यंत सवलत देण्यात आली आहे. तर एप्रिल महिन्याची वीज देयके भरण्यासाठी ३१ मे पर्यंत सवलत देण्यात आली आहे.