कल्याण-मुंबई लोकल सेवा विस्कळित; प्रवासी तीन तास ताटकळले
कल्याण रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाच्या कामासाठी घेण्यात आलेला सुमारे तीन तासांच्या मेगा ब्लॉकमुळे कल्याण स्थानकातून होणारी लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या काळात कर्जत रेल्वेमार्ग सुरू असला तरी या मार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ा दीड ते दोन तासानंतर येत असल्याने कल्याण, डोंबिवली स्थानकात प्रचंड गर्दी उसळली होती. उन्हाच्या झळा, फलाटांवर उसळलेली तोबा गर्दी आणि बसण्यासाठी जागा नसल्याने प्रवाशांना ताटकळत पुढील लोकलची वाट पाहण्याची वेळ होती. तर अनेकांनी एसटीचा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला मात्र रस्ते वाहतूकही पुरशी सक्षम नसल्याचा फटका सगळ्यांनाच बसत होता.
कल्याण रेल्वेस्थानकात उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलासाठीच्या सुमारे २४ मीटर लांबीचे गर्डर चढवण्याचे काम रविवारी मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आले होते. रविवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळामध्ये हा काम सुरू राहणार असल्याने कल्याण स्थानकातील अनेक लोकल गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या. कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १, १ए, २, ३ आणि ४ हे चारही फलाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले होते. तसेच कल्याण स्थानकातून सोडण्यात येणाऱ्या गाडय़ा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या होत्या. तर या काळात सीएसटीकडून टिटवाळा, आसनगाव आणि कसाऱ्याकडे जाणाऱ्या गाडय़ाही बंद करण्यात आल्या होत्या. प्रवाशांना कल्याण स्थानकात सुमारे चार तासांहून अधिक काळ ताटकळत बसावे लागले. अनेकांनी रस्ते वाहतुकीचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला मात्र या भागात सक्षम रस्तेवाहतूक नसल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत होता. अनेक लहान मुलांना घेऊन सहकुटुंब प्रवासासाठी निघालेल्या मंडळींना याचा त्रास सहन करावा लागत होता.
कल्याण-कर्जत आणि खोपोलीकडे जाणारा मार्ग खुला असला तरी तोही अत्यंत धिम्या गतीने सुरू होता. कल्याणपासून ठाण्यापर्यंत जलद मार्गावरही मेगा ब्लॉक असल्याने ती वाहतूकही पूर्णपणे बंद असल्याचा फटका त्याला बसत होता.