डिओड्रंट आणि चॉकलेट उधार दिले नाही म्हणून दुकानदार आणि त्याच्या भावावर चौघांनी खुनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना शहापुरात घडली आहे. याप्रकरणी चौघे हल्लेखोर फरार झाले असून शहापूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर ठाणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहापुरातील सोनुभाऊ बसवंत मार्गावरील अवधूत मेडिकलमधून महेश गायकवाड याने डिओड्रंट आणि चॉकलेट घेतले, या वस्तूंचे पैसे मेडिकल दुकानदार लक्ष्मण सदगीर याने मागितले. यावर पैसे नसल्याचे सांगत महेशने सदगीर याला उधार देण्याची मागणी केली. मात्र, सदगीरने उधार देता येणार नाही असे सांगितल्यावर महेशने त्याला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. साधारण महिन्याभरापूर्वी हा प्रकार घडला होता.

महिन्याभरापूर्वी झालेल्या या प्रकाराचा राग मनात धरून मेडिकल दुकानदार रामनाथ व लक्ष्मण सदगीर या दोघा भावांवर शुक्रवारी रात्री महेश गायकवाड व त्याच्या साथीदारांनी खुनी हल्ला केला. याबाबतची तक्रार लक्ष्मण सदगीरने आज (रविवारी) शहापूर पोलिसांत दाखल केली. रामनाथ सदगीरच्या डोक्यात तलवारीचा जोरदार वार झाल्याने त्याला ठाणे येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हल्ला करून फरार झालेल्या चौघांचा शहापूर पोलीस शोध घेत आहेत.