नालासोपारा पोलिसांना १९ जणांचे आयपी पत्ते शोधण्यात यश

वसई: चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात नालासोपारा पोलिसांनी १९ जणांचे आयपी पत्ते (इंटरनेट प्रोटोकॉल) शोधून त्यांचे तपशील सायबर कक्षाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. यामुळे या आयपी अ‍ॅड्रेसचा वापर करून कुणी कुणी अश्लील साहित्य प्रसारित केले, कुठून अपलोड झाले ते शोधण्यास मदत होणार आहे.

भारतातून फेसबुकचा वापर करून मोठय़ा प्रमाणात अल्पवयीन मुला-मुलींचे लैंगिक साहित्य प्रसारित केले जात असल्याचे उघड झाले होते. ते रोखण्यासाठी अमेरिकेच्या ‘नॅशनल सेंटर ऑफ मिसिंग अ‍ॅण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन’ (एनमॅक) आणि राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग (एनसीआरबी) यांच्यात लहान मुलांच्या अश्लील साहित्य (चाइल्ड पोर्नोग्राफी) संबंधित माहितीची देवाण-घेवाणीबाबत करार झाला होता. एनमॅकने या अत्याचाराची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती फेसबूकसह अन्य समाजमाध्यमांवरून प्रसारित झालेले आयपी अ‍ॅड्रेस आणि अन्य तांत्रिक तपशील (टीपलाइन) राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाला दिले होते. त्यांनी संपूर्ण देशातून वर्गवारी करून संबंधित राज्यांना माहिती दिली होती.

महाराष्ट्रातील सुमारे १७०० प्रकरणे (टीपलाइन) महाराष्ट्र सायबरकडे सुपूर्द करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र सायबरने तांत्रिक माहितीआधारे ध्वनिचित्रफीत, छायाचित्रे प्रसारित करणाऱ्या व्यक्तींची ओळख आणि हे पुरावे विविध पोलीस ठाण्यांना कारवाईसाठी वर्ग केले आहेत. पालघर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास तुळिंज पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. २३ एप्रिल २०१९ ते ८ मे २०१९ या कालावधीत बालकांचे अश्लील साहित्य संबंधित आयपी अ‍ॅड्रेसवरून प्रसारित करण्यात आल्याची माहिती फेसबुकने दिली होती. यानुसार तुळिंज पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तुळिंज पोलिसांनी याप्रकरणी अश्लील चित्रफिती जप्त केल्या असून संबंधित आयपी अ‍ॅड्रेसचे तपशील सायबर विभागाला दिले आहेत. त्यामुळे या चित्रफितींचा उगम कुठून झाला, कुणी कुणी या आयपी अ‍ॅड्रेसचा वापर करून साहित्य प्रसारित केले, ते समजू शकणार आहे.

 – जी. जे. वळवी, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तुळिंज पोलीस ठाणे</strong>