अनधिकृतरित्या मोबाईल कंपन्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) काढल्याप्रकरणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मात्र, नवाजुद्दीनला त्याच्या पत्नीचा सीडीआर मिळवून देण्यात मदत करणारा वकिल रिझवान सिद्दीकी याला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महिन्याभरापूर्वी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सीडीआर प्रकरणाचा खुलासा केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. बेकायदा लोकांचे सीडीआर काढल्याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ११ जणांना अटक केली होती. यामध्ये भारतातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांचाही समावेश होता. त्यांना दोनच दिवसांपूर्वी जामीन मिळाला. नवाजुद्दीनचा वकील सिद्दीकी याला अटक केल्यानंतर या प्रकरणात १२ वी अटक झाली आहे.

वकील रिझवान सिद्दीकी याला पोलिसांनी सीडीआर प्रकरणी यापूर्वीच चौकशी केली आहे. मात्र, शुक्रवारी अटक झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. नवाजुद्दीनलाही न्यायालयाने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. मात्र, तो अद्याप पोलिसांसमोर हजर झालेला नाही.