23 October 2020

News Flash

दाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी

पथक वेळेवर पोहोचूनही मदतकार्य विलंबाने

पथक वेळेवर पोहोचूनही मदतकार्य विलंबाने

ठाणे : भिवंडी शहरातील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली बेकायदा इमारत सोमवारी पहाटेच्या सुमारास कोसळली आणि या भागात मदतीसाठी धावाधाव सुरू झाली. भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाने जिल्हा प्रशासनाला या घटनेची माहिती देताच जेमतेम अध्र्या तासाच्या अंतराने या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान पोहोचले. पाऊस नसल्यामुळे या पथकाचे काम वेगाने सुरू होईल आणि परिस्थिती लगेच आटोक्यात येईल, अशी आशा होती. मात्र, अत्यंत दाटीवाटीच्या क्षेत्रात असलेली इमारत आणि ढिगाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता यांमुळे मदत पथक वेळेवर पोहोचूनही प्रत्यक्षात बचावकार्य सुरू होण्यात बऱ्याच अडचणी आल्या.

दाटीवाटीच्या क्षेत्रात असलेल्या या इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी पाच फूट रुंदीचा रस्ताही नाही. ढिगारा उपसण्यासाठी पथकाने तातडीने जेसीबी यंत्र या ठिकाणी आणले. इतर साहित्यही वेगाने पोहोचविण्यात आले. मात्र जेसीबी यंत्र इमारतीपर्यंत नेताच आले नाही आणि दुपारी उशिरापर्यंत हातानेच राडारोडा उपसण्याचे काम जवानांना करावे लागले. शहरातील धामणकर नाका, अंजुर फाटा, गैबीनगर या भागात अनेक अनधिकृत इमारतींचे जाळे असून या इमारती अतिशय दाटीवाटीने उभारण्यात आल्या आहेत. शहरातील बहुतांश इमारतींची रचना अशा पद्धतीने असल्यामुळे अनेक घरांमध्ये पुरेसा प्रकाशही येत नाही. त्यामुळे तेथे वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना दिवसाही घरातील दिवे सुरू ठेवावे लागतात.

शहरातील धामणकर नाका भागातील पटेल कंपाउंड परिसरात असलेली जिलानी ही तीन मजली इमारत सोमवारी पहाटे तीन वाजून ४० मिनिटांनी कोसळली. या इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी पाच फूट रुंदीचा रस्ताही नाही. तसेच इमारतीच्या चारही बाजूंनी इतर बेकायदा इमारतींचा वेढा आहे. ही घटना घडताच अर्धा तासाच्या कालावधीत ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठोपाठ राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची एक तुकडीही दाखल झाली. या पथकाला ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अवश्यक असलेली यंत्रणा, जेसीबी यंत्र घटनास्थळी दाखल झाली. मात्र यंत्रांचा उपयोग उशिरापर्यंत होऊ शकला नाही. अतिशय अडचणीच्या ठिकाणी असलेल्या या इमारतीजवळ सकाळी १०च्या सुमारास जेसीबी पोहोचवण्यास पथकाला यश आले. त्यामुळे सकाळी ११ वाजेनंतर मदकार्यास वेग आला.

रुग्णवाहिका पोहोचण्यासही विलंब

ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या जखमींना १५० ते २०० मीटर लांब उचलून रुग्णवाहिकेजवळ न्यावे लागत होते. त्यानंतर इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येत होते. सकाळी आठ वाजेनंतर रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी वाढू लागल्यामुळे रुग्णालय गाठण्यास २० ते २५ मिनिटांचा कालावधी लागत होता. त्यामुळे १० वाजता वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक उड्डाणपुलावरून वळवून रुग्णवाहिकेला वाट काढून दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 1:54 am

Web Title: ndrf team bhiwandi building collapse zws 70
Next Stories
1 यंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका?
2 धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी
3 खाटा रिकाम्या तरीही दमछाक
Just Now!
X