भगवान मंडलिक

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील १६ लाखलोकसंख्येसाठी रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर ही १०० खाटांची रुग्णालये, १३ आरोग्य केंद्रे आहेत. २५ वर्षांपूर्वी १० लाख लोकसंख्येसाठी उपलब्ध केलेली ही वैद्यकीय सुविधा सध्याची लोकसंख्या आणि रुग्णांसाठी तुटपुंजी आहे. दोन्ही रुग्णालयांत रोज बाराशे ते तेराशे रुग्ण उपचार घेत असतात. पावसाळा, थंडीतील साथीच्या आजारांमध्ये हा आकडा दोन हजारांच्या घरात पोहोचतो. पालिकेचा अर्थसंकल्प काही वर्षांपूर्वी २५० कोटी होता, तेव्हा ज्या वैद्यकीय सुविधा होत्या, तितक्याच सुविधा अर्थसंकल्प २१०० कोटींचा झाला तरी कायम आहेत. शहराचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून येथील प्रशासकीय, राजकीय व्यवस्थेने फारसा पुढाकार घेतला नाही. त्याचे चटके करोना महामारीत शहरवासीयांना काही महिने बसले.

आगामी काळात दोन रुग्णालये आणि १३ आरोग्य केंद्रे वाढत्या रुग्णसंख्येला पुरेशी पडणार नाहीत. त्यामुळे करोनाकाळात उभारलेल्या आरोग्य व्यवस्था तसेच कल्याणमधील लालचौकी, टिटवाळा येथील जागेत सुरू केलेली करोना रुग्णालये सर्व प्रकारच्या आजारांच्या रुग्णांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही रुग्णालये येणाऱ्या काळात आहे त्या जागेत बहुद्देशीय पद्धतीने विकसित करण्याचा मानस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे. लालचौकी येथील साडेचार हजार चौरस मीटर जागेतील करोना रुग्णालयात १०७ अतिदक्षता विभाग, १६० प्राणवायूच्या खाटा आहेत. तीन खाटांची डायलिसिस सुविधा आहे. खासगी रुग्णालयाप्रमाणे येथे शवागार आहे. डॉक्टर, कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा खोल्या उपलब्ध आहेत. १० हजार लिटर क्षमतेची पातळ प्राणवायू साठवण टाकी आहे. टिटवाळा येथे समावेशक आरक्षणाखाली पालिकेला ९४२ चौरस मीटरची तीन माळ्यांची बांधीव इमारत मिळाली आहे. करोना रुग्णांच्या सेवेसाठी येथे तात्पुरते करोना रुग्णालय असले तरी तिथे महासाथ आटोक्यात येईल, त्याप्रमाणे कायमस्वरूपी सामान्य रुग्णालय सुरू ठेवण्यात येणार आहे. येथे १२५ खाटा आहेत. लालचौकी येथील रुग्णालयाचा येणाऱ्या काळात आधारवाडी, गंधारे, पडघा, उंबर्डे, सापर्डे, कोन परिसरातील, टिटवाळा येथील रुग्णालयाचा मोहने, आंबिवली, शहाड, मांडा, कल्याण ग्रामीण भागातील रुग्ण लाभ घेतील.

महापालिका रुग्णालयात चाळ, झोपडपट्टी, दुर्बल घटकांतील रुग्ण उपचार घेत असतात. अनेक सुस्थितीत कुटुंबांतील रुग्णही प्रसूती, इतर वैद्यकीय उपचार पालिका रुग्णालयांमधूनच घेतात. त्यांना ही नवीन रुग्णालये वरदान आहेत. करोनामुळे शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयांमध्ये सुसज्ज वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डोंबिवलीतील मध्यवर्ती ठिकाणच्या रखडलेल्या सूतिकागृहाच्या खासगी तत्त्वावर उभारणीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पालिकेला वैद्यकीय सेवेसाठी वर्षभरात सुमारे २५० कोटी खर्च येतो. तेवढाच खर्च बा स्रोतांमधून वैद्यकीय सेवा घेतली तरी येत असतो. बा स्रोतांमधून खासगी तत्पर सुविधा उपलब्ध होत असल्याने रुग्ण उपचारांनी समाधानी होतो. बा सेवेबरोबर पालिकेने शासन मंजूर ९० वैद्यकीय पदे भरतीसाठी पावले उचलली पाहिजेत. तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून द्यायला हवेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १९० परिचारिका, चार वैद्यकीय अधिकारी समर्पित रुग्ण सेवा देऊनही अस्थायी आहेत. त्यांचा सदुपयोग प्रशासनाने केला पाहिजे. परिचारिकांची ७२ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात ५५ काम करतात. रुग्णालय जोडीला निवासाची व्यवस्था नसल्याने रुग्णालयात मुंबई, नवी मुंबई परिसरात निवास करणारा डॉक्टर पालिकेत तग धरत नाही. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वेतनाचे प्रश्न रेंगाळत ठेवले की त्याचा फटका रुग्णांना बसतो. तज्ज्ञ डॉक्टर येथे टिकत नाहीत.

शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई ही क्षेत्रफळ आकाराच्या दृष्टीने मोठी रुग्णालये तिथे वाणिज्य दृष्टिकोन न ठेवता डॉक्टरांना निवास सुविधा, सुसज्ज वैद्यकीय साधनांसह सुसज्ज कशी होतील याचा विचार झाला पाहिजे. आरोग्य केंद्र कोंडवाडय़ासारखी राहता कामा नयेत. यासाठी नवे आयुक्त पुढाकार घेतील, अशी आता अपेक्षा आहे. करोनाने आरोग्य सेवा कशी असली पाहिजे हे शिकवले आहे. आता प्रशासनाने त्याच्या बळकटीकरणासाठी पावले उचलायला हवीत हे यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले आहे.