करोना रुग्णांसाठी ११७७ खाटा; १९६ अतिदक्षता खाटा

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील साकेत, कळवा, मुंब्रा आणि वागळे इस्टेट भागात तात्पुरत्या कोविड रुग्णालयाची उभारणी प्रशासनाने केली आहे. त्यापाठोपाठ माजिवाडा येथील पूर्व द्रुतगती महामार्गालगत बहुमजली वाहनतळामध्ये ११७७ खाटांचे नवे कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये अतिदक्षता कक्षात १९६ खाटांची उभारणी केली जाणार आहे. उर्वरित खाटा या प्राणवायूयुक्त असणार आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ३० हजार ६०१ करोना रुग्ण आढळले आहेत. सुरुवातीच्या काळात महापालिकेने शहरातील खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन त्यांना कोविड रुग्णालये म्हणून घोषित केले. परंतु या रुग्णालयांच्या उपचाराची बिले लाखांच्या घरात असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी हा खर्च परवडत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने शहरात तात्पुरत्या कोविड रुग्णालयांची उभारणी गेल्या काही दिवसांपासून सुरू केली आहे. सुरुवातीला साकेत परिसरातील महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हब इमारतीत महापालिकेने एमएमआरडीएच्या मदतीने एक हजार खाटांचे तात्पुरते कोविड रुग्णालय उभारले. त्यानंतर कळवा आणि मुंब्रा परिसरातही अशाच प्रकारचे रुग्णालय उभारले आहे. तसेच वागळे इस्टेट परिसरातील बुश कंपनी येथे ४९० खाटांचे तात्पुरते कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर पोखरण भागातील व्होल्टास कंपनीमध्येही कोविड रुग्णालय उभारण्यात येणार असून त्यापाठोपाठ माजिवाडा येथील पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या बहुमजली वाहनतळामध्ये ११७७ खाटांचे नवे कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी निविदा काढल्या आहेत.

२० कोटी ८४ लाख खर्च

* माजिवाडा येथील पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या बहुमजली वाहनतळामध्ये ११७७ खाटांचे नवे कोविड रुग्णालय होणार आहे.

* वाहनतळाच्या पहिल्या मजल्यावर १९६ आयसीयू खाटा, तर दुसरा, तिसरा आणि चौथ्या मजल्यावर प्रत्येकी ३२७ याप्रमाणे ९८१ ऑक्सिजन खाटांची व्यवस्था केली जाणार आहे.

* या कामासाठी २० कोटी ८४ लाख ८ हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.