कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मोहिली आणि बारावे या जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे मंगळवार, ७ जानेवारी रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत कल्याण-डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे मोहिली आणि बारावे या दोन ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. या दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत आणि यांत्रिक उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीचे काम येत्या ७ जानेवारीला हाती घेण्यात येणार आहे. १२ तास हे काम सुरू राहणार आहे.

त्यामुळे या दुरुस्तीच्या कालावधीत महापालिकेच्या मोहिली, नेतिवली आणि बारावे जलशुद्धीकरण केंद्रांमधून कल्याण पूर्व, पश्चिम, ग्रामीण आणि डोंबिवली पूर्व, पश्चिम या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच रात्री ८ नंतर शहराचा पाणीपुरवठा पूवर्वत करण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.