ध्वनी, वायुप्रदूषणात वाढ झाल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट

कल्याण : कल्याण, डोंबिवलीतील ध्वनी, वायुप्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. वाहतूक कोंडी हे यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. यासंदर्भात पालिकेने व्यापक सर्वेक्षण करणे आवश्यक आहे, असा अहवाल कल्याणमधील ‘स्काय लॅब अ‍ॅनालिटिकल लॅबोरेटरी’ने महापालिका प्रशासनाला दिला आहे.

राज्य घटनेच्या ७४व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियमाअंतर्गत पालिका हद्दीतील पर्यावरणविषयक अहवाल प्रशासनाने दरवर्षी ३१ जुलैपर्यंत शासनाला सादर करणे बंधनकारक आहे. कल्याण डोंबिवली पालिकेने गेल्या २३ वर्षांत प्रथमच हा अहवाल तब्बल पाच महिने उशिरा सर्वसाधारण सभेला सादर केला आहे. दरवर्षीच्या पर्यावरण अहवालावरून पालिका हद्दीतील प्रदूषण पातळी रहिवाशांना कळते. हा अहवाल खासगी संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. संस्थेने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांमधील वायू आणि ध्वनिप्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीवर पोहचल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका हद्दीत कल्याणमध्ये रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण सत्र न्यायालय, के.सी.गांधी शाळा, मोहिंदरसिंग काबलसिंग शाळा, शारदा विद्यालय, अग्रवाल महाविद्यालय, आधारवाडी चौक, डोंबिवलीत जोंधळे हायस्कूल, मंजुनाथ विद्यालय, शास्त्रीनगर रुग्णालय, नेहरू मैदान, पेंडसेनगर ही शांतता क्षेत्रे आहेत. या क्षेत्रांत ध्वनिप्रदूषण प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे ‘स्काय लॅब’च्या पथकाला आढळले. सार्वजनिक उत्सव, कार्यक्रमांवेळी या भागांतील ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण अधिक असते. ही गंभीर बाब असून प्रशासनाने यावर उपाय योजना करण्याचे सुचविले आहे.

वायुप्रदूषणाचे प्रमाण गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा कमी झाले असले, तरी सर्वाधिक वायुप्रदूषण शिवाजी चौक, कल्याण रेल्वे स्थानक परिसर, शहाड नाका, शिवाजी चौक, डोंबिवली पालिका विभागीय कार्यालय येथे आढळले आहे. हवेतील धूलिकण मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात असतील तर त्याचा सर्वाधिक त्रास लहान मुले, गर्भवती, वृद्ध यांना होतो, असे अहवालात म्हटले आहे.

निरीक्षणे आणि सूचना

* औद्योगिक क्षेत्रात वीजपुरवठय़ासाठी जनरेटर वापरले जातात, त्यामुळे होणारे प्रदूषण, यंत्रांचा आवाज आरोग्यास हानिकारक ठरत आहे. उत्सवांच्या काळात तलाव, खाडीकिनारचे ध्वनिप्रदूषण सर्व पातळ्या ओलांडते, असे निरीक्षण ‘स्काय लॅब’ने नोंदवले आहे.

* कालबाह्य झालेल्या, धूर सोडणाऱ्या वाहनांवर ‘आरटीओ’, वाहतूक विभागाने तातडीने कारवाई करावी, शांतता क्षेत्रात भोंगे, वाद्य वाजवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, एकदिशा मार्ग सुरू करावेत, सर्व बस, रिक्षा, अन्य वाहने ‘सीएनजी’ वर धावावीत, यासाठी व्यापक उपाय करावेत, अशा सूचना अहवालात करण्यात आल्या आहेत.

प्रदुषणामुळे वाढलेले आजर

रक्तदाब, बहिरेपणा, चिडचिड, हदयाची धडधड, थकवा हे प्रकार वाढत आहेत.