25 September 2020

News Flash

मांसाहार महागला!

थंडीची चाहूल लागताच चिकन, मटण, मासळीच्या दरांत वाढ

मटणाच्या दुकानात ग्राहकांची गर्दी होत आहे.

थंडीची चाहूल लागताच चिकन, मटण, मासळीच्या दरांत वाढ; मटण ५२० तर चिकन २०० रुपये किलोवर

तापमानाचा पारा घसरून थंडीचे आगमन होत असतानाच मांसाहार विक्रेत्यांनी चिकन, मटणाच्या दरात वाढ करून खवय्यांना घाम फोडला आहे. मटणाचे दर किलोमागे ४० ते ५० रुपयांनी वाढवण्यात आले असून गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत चिकनच्या दरांतही ७० ते ८०रुपये प्रतिकिलो अशी वाढ करण्यात आली आहे. मासळीच्या दरांतही घसघशीत वाढत झाली असून दिवाळीपर्यंत १२०० रुपये किलो दराने विकले जाणारे मोठे पापलेट आता १६०० रुपयेया दराने विकले जात आहेत.

मुंबई, ठाण्यासारख्या शहरात हिवाळा दोन ते तीन महिनेच असतो. मात्र, थंडीची चाहूल लागताच अधिक ऊर्जेसाठी मांसाहाराकडे अनेकांचा ओढा वाढतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात मागणी वाढत असल्याने अंडी, चिकन, मटण, मासे यांचे दर आपसूकच वाढतात. यंदाही हाच कल दिसून आला आहे. थंडीचे दिवस अजूनही सुरू झाले नसले तरी, हवेतील गारठा वाढल्याचा फायदा घेऊन चिकन, मटणचे दर वाढवण्यात आले आहेत. दहा दिवसांपूर्वी ४८० रुपये किलोने विकले जाणारे मटण आता काही ठिकाणी ५२० ते ५४० रुपये या दराने विकले जात आहे.दोन महिन्यांपूर्वी बॉयलर चिकनचे दर १३० रुपये असे होते, ते आता दोनशे झाले आहे. तर ३०० रुपये किलोने मिळणारी गावठी कोंबडी आता साडेतीनशे रुपयांना विकली जात आहे.

आवक नसल्याने मासेही महाग

चिकन, मटण महाग झाले असतानाच मासळी बाजारातही महागाई अवतरली आहे. १२०० रुपये किलोने विकले जाणारे पापलेट सद्या १६०० किलोने विकले जात आहेत. तर ३०० रुपयाला विकली जाणारी सुरमई ही ६०० रुपये किलोपर्यत पोहचली आहे.  ५०० रुपयांना मिळणारी छोटय़ा कोळंबीची टोपली ही सद्या ८०० ते १००० रुपये किलो आहे.

थंडीच्या दिवसांत मासे समुद्राच्या तळाजवळ जातात. त्यामुळे मासेमारी करणे कठीण होते. आवक घटल्याने मासळीच्या दरात वाढ झाल्याचे भारती कोळी या विक्रेत्या महिलेने सांगितले. सध्या घोळ माशाला चांगली मागणी असली तरी त्याच्या दरातही मोठी वाढ झालेली आहे. ४०० किलोने विकला जाणारा घोळ मासा ६०० रुपये किलोने विकला जात आहे. बोंबील माशाचा हंगाम नसल्याने बोंबलाचीही आवक घटली आहे. बांगडय़ाचा हंगाम सुरु झाला असला तरी चांगल्या प्रतीचा माल येत नसल्याचे मच्छीमार संघटनेचे माजी अध्यक्ष जयिवद कोळी यांनी सांगितले.

थंडी सुरु झाली आहे. या काळात खवय्यांची मांसाहारासाठी अधिक मागणी असते. ५० ते ६० रुपयांनी दर वाढवण्यात आले असले तरी नागरीक खरेदीसाठी गर्दी करत आहेत.   – हुसेन कुरेशी, चिकन-मटण विक्रेते, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 1:44 am

Web Title: non veg is expensive
Next Stories
1 उल्हासनदीच्या पाण्यावर टँकरमाफियांचा डल्ला
2 ६० रिकाम्या इमारतींवर हातोडा
3 मोर्चादरम्यानही वाहतूक सुरळीत
Just Now!
X