News Flash

एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व सिद्ध

ठाणे जिल्हय़ात शिवसेनेच्या नेत्याचा दबदबा निर्माण झाल्यावर या नेत्याचे पद्धतशीरपणे पंख कापले जातात.

फाटक यांच्यासह विजय साजरा करताना एकनाथ शिंदे आणि भाजप कार्यकर्ते.

शिवसेनेचा ठाण्याचा ‘इतिहास’ शिंदेसाठी त्रासदायक

प्रतिकूल परिस्थितीतही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेपाठोपाठ विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात शिवसेनेला मिळालेल्या विजयाने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हय़ाच्या राजकारणावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आनंद दिघे वा गणेश नाईक यांनी जिल्हय़ात दबदबा निर्माण केल्यावर ‘मातोश्री’ने त्यांचे पंख छाटले होते हा ठाण्याचा इतिहास लक्षात घेता ‘शिंदे’शाहीच्या वाढत्या वर्चस्वाला आज ना उद्या लगाम लावला जाऊ शकतो का, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.

आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्हय़ात शिवसेनेचे वर्चस्व कायम राखण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. नारायण राणे व राज ठाकरे पक्षातून बाहेर पडल्यावर ठाणे जिल्हय़ाच्या किल्ल्याला भगदाड पडू नये म्हणनू ‘मातोश्री’ने शिंदे यांना ताकद दिली. शिंदे यांनी पक्षवाढीसाठी मेहनत घेतली.

जिल्हय़ात शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीमध्ये यश मिळवून दिले. विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यावर मोदी लाटेत जिल्हय़ात भाजपचे जास्त आमदार निवडून आले तरी शिवसेनेने त्यांच्यावर विधिमंडळ गटनेतेपदाची जबाबदारी सोपविली. शिवसेना विरोधात बसल्यावर काही काळ विरोधी पक्षनेतेपदही शिंदे यांच्या वाटय़ाला आले होते.

सत्तेत सामील झाल्यावर शिंदे यांना मंत्रिपद मिळाले, पण तुलनेत कमी महत्त्वाचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) या खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली. ‘मातोश्री’ची खप्पा मर्जी होऊ नये म्हणून शिंदे नेहमीच ‘विशेष’ खबरदारी घेत असतात. मधल्या काळात म्हणजेच आघाडीची सत्ता असताना शिंदे यांची पावले इतरत्र वळू लागल्याची चर्चा होती. काही भेटीगाठीही झाल्या होत्या, पण शिंदे यांनी त्याचा इन्कार केला होता.

भविष्यात धोक्याची घंटा?

अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर या जिल्हय़ातील दोन मोठय़ा नगरपालिका जिंकल्यावर शिंदे यांचा आत्मविश्वास वाढला. कल्याण-डोंबिवलीमध्ये सारे प्रतिकूल वातावरण व त्यातच भाजपने सारी शक्ती पणाला लावल्याने शिंदे यांच्या नेतृत्वाची कस लागली होती. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजप किंवा सरकारी यंत्रणेच्या गैरवापराने संतप्त झालेल्या शिंदे यांनी राजीनामा देण्याची घोषणा करीत सहानुभूती मिळविली. वाघाच्या जबडय़ात हात घालण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी केली होती. तरीही डावपेच लढवून शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीची निवडणूक जिंकली. कल्याणच्या विजयाने शिंदे यांचे महत्त्व अर्थातच वाढले. विधान परिषदेच्या निवडणुकीत वसंत डावखरे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा सामना करण्याचे आव्हान होते, पण शिंदे यांनी हे आव्हान पेलले. भाजप आणि शिवसेनेत कटुता निर्माण झाली असली तरी मुख्यमंत्र्यांचे दरवाजे ठोठावले. भाजपची मते फुटणार नाहीत याची खबरदारी घेतली. काँग्रेस व राष्ट्रवादीतील नाराजांना गळाला लावले. शिंदे यांनी डावखरे यांचे डाव ‘खरे’ होऊ दिले नाहीत. ठाणे जिल्हय़ात शिवसेनेच्या नेत्याचा दबदबा निर्माण झाल्यावर या नेत्याचे पद्धतशीरपणे पंख कापले जातात. आनंद दिघे, सतीश प्रधान वा गणेश नाईक यांच्याबाबतीत हे अनुभवाला आले आहे. यामुळेच हे यश शिंदे यांच्यासाठी भविष्यात धोक्याची घंटा ठरू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2016 3:13 am

Web Title: once again eknath shinde hold in thane prove after shiv sena candidate ravindra pathak win
टॅग : Eknath Shinde,Shiv Sena
Next Stories
1 ठाण्यात शिवसेनेचे रवींद्र फाटक विजयी
2 Thane vidhan parishad election result: ठाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत रवींद्र फाटक विजयी
3 कल्याणच्या आधारवाडी कचराभूमीला पुन्हा आग
Just Now!
X