शहापूर दि. २१ (वार्ताहर) करोना संसर्गाचे वाढते अतिक्रमण रोखण्यासाठी येत्या २४ तारखेपासून आठवडा भर जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय सर्वपक्षीय समितीमध्ये आज घेण्यात आला. याबाबत शहापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतीना सूचित केले आहे.

तालुक्यात करोनाने थैमान घातले असून यावर उपाययोजना करण्यासाठी आज शहापूर पंचायत समितीच्या शेतकी भवनात तालुक्याचे आमदार दौलत दरोडा यांच्या अध्यक्षते खाली सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वानुमते येत्या गुरुवार पासून ते बुधवार पर्यंत संपूर्ण तालुक्यात जनता कर्फ्यू लावण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या जनता कर्फ्यूमध्ये केवळ दवाखाने व मेडिकल स्टोअर्स या अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार आहेत. अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

गावागावात याची अमलबजावीसाठी करण्यासाठी गाव पातळीवर ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य पोलीस पाटील यांनी नियंत्रण ठेवायचे असून पोलीस पथक यावेळी गस्त घालणार आहेत. सर्व नागरिकांनी यासाठी स्वतः हून काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. यावेळी गटविकास अधिकारी सुशांत पाटील तालुका आरोग्य अधिकारी तरुलता धानके,सभापती रेश्मा मेमाणे,व व्यापारी मंडळाचे अध्यक्ष व सर्वच पक्षाचे नेते यावेळी बैठकीस उपस्थित होते