भक्तांची गैरसोय दूर करण्यासाठी फेसबुक, झूम माध्यमांचा वापर

डोंबिवली : करोनाचा प्रादुर्भाव, शहराच्या विविध भागांत असलेला करोना तीव्र संक्रमित आणि प्रतिबंधित क्षेत्र विचारात घेऊन कल्याण, डोंबिवली तसेच पुणेसह इतर शहरांतील काही पुरोहितांनी फेसबुक, झूम आदी तंत्रस्नेही माध्यमांद्वारे गणपतीची भाविकांना यथासांग पूजा सांगण्याचा निर्णय घेतला आहे.

अंतरसोवळे निर्बंधामुळे काही पुरोहितांची होणारी अडचण विचारात घेऊन सामाजिक भावनेतून ही सेवा देणार आहेत. यासाठी काहींनी दक्षिणेसाठी सवलत, तर अनेकांनी मात्र यथासांग पूजेसाठी दक्षिणेचा दरही निश्चित केला आहे.

डोंबिवली, कल्याण परिसरांतील अनेक पुरोहित गणेशोत्सवात गणेशपूजनासाठी नियमित भक्तांचे घरगुती, सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना करून देतात. काही पुरोहित या शहरांसह मुंबई, नवी मुंबई, पनवेल भागांत गणपतीपूजनासाठी जातात. या वेळी करोना साथीमुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. बहुतांशी शहरांत अद्यापही करोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. अनेक भागांत तीव्र संक्रमित, प्रतिबंधित क्षेत्र कायम आहेत. याशिवाय अनेक निवासी इमारतींमध्ये करोनाचे रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. तेथे जाण्या-येण्यावर निर्बंध आहेत. अशा संक्रमणात गणेशभक्त अडकले आहेत. काही पुरोहितांनी फेसबुक, झूम माध्यमांतून भक्तांना गणपतीची यथासांग पूजा सांगण्याची तयारी केली आहे. पूजेला ऑनलाइन सुरुवात होताच त्याप्रमाणे पुरोहित सांगतील तशी यथासांग पूजा करावी, असे डोंबिवलीतील ज्येष्ठ पुरोहित प्रदीप जोशी यांनी सांगितले.

करोनाचा प्रादुर्भाव, शासनाचे नियम या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी पुरोहित गणपतीपूजनासाठी पोहोचतील की नाही याची खात्री नाही. लोकलही बंद आहेत. खासगी वाहन भाडय़ाने घेऊन गणपतीपूजनासाठी फिरणे शक्य नाही. त्यामुळे गणेशभक्तांची अडचण विचारात घेऊन फेसबुकच्या माध्यमातून गणपतीची पूजा सांगणार आहोत. सकाळी ९ वाजता ऑनलाइन पद्धतीने पूजेला सुरुवात होईल. यासाठी दक्षिणा देण्याची कोणावर सक्ती नाही. ज्यांना द्यायची असेल त्यांनी घरी येऊन किंवा अन्य माध्यमांतून दिली तरी त्याचे स्वागत आहे. पुरोहित नाहीत म्हणून गणपतीपूजन कसे करायचे ही अडचण दूर करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

– प्रदीप जोशी, डोंबिवली.