वसई-विरारच्या महापौरांची आरोग्य विभागाला ताकीद, मांसविक्रेत्यांना १५ दिवसांची मुदत

शहरातील उघडय़ावर होणाऱ्या चिकन आणि मटण विक्रीला वसई-विरार महापालिकेने बंदी घातली असून अशा प्रकारची विक्री करणारी दुकाने बंद करण्यासाठी विक्रेत्यांना १५ दिवसांचा अवधी दिला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महापौरांनी पुढाकार घेतला असून आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. जर शहरात उघडय़ावर मांस विक्री होताना आढळली तर संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

वसई-विरार शहरात जागोजागी चिकन आणि मटण विक्रीची दुकाने आहेत. ही दुकाने उघडय़ावर असल्याने तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो, तसेच कापलेले मटण उघडय़ावर टांगून ठेवण्यात येत असल्याने या मटणावर माश्या बसतात, रस्त्यावरची धूळ बसते. हेच मटण विकले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मटण विक्री करणाऱ्या दुकानांजवळ अस्वच्छताही असते. याबाबतच्या अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत महानगरपालिकेला मटणाची दुकाने बंदिस्त करण्याबाबतचे निर्देश दिले. त्यानुसार महापौर प्रवीणा ठाकूर यांनी आरोग्य विभागाला कत्तलखाने बंद करावे आणि मटणाची दुकाने रस्त्यावर उघडी दिसता कामा नये, अशी आदेशवजा ताकीद दिली आहे.

काही दिवसांपूर्वी पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व विक्रेत्यांना या नियमांचे पालन करण्यासंबंधातील नोटिसा बजावल्या होत्या.

१५ दिवसांत दुकाने बंदिस्त करावीत तसेच अनधिकृत दुकाने अधिकृत करून घ्यावीत, अशा सूचना त्यात देण्यात आल्या होत्या. या नियमांचे पालन योग्य रीतीने व्हावे यासाठी महापौरांनी पुढाकार घेतला असून याबाबत त्यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन सर्वाना सूचना दिल्या आहेत. यापुढे शहरात कुठेही चिकन आणि मटण विक्रीची दुकाने उघडय़ावर दिसता कामा नये. ती जर आढळली तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी ताकीद त्यांनी दिली. याशिवाय शहरात एकही बेकायदा कत्तलखाना दिसता कामा नये, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

आक्रमक पवित्र्याचे स्वागत

महापौरांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अधिकारी कामाला लागले असून त्यांनी नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या या निर्णयाचे विविध संस्था आणि संघटनांनी स्वागत केले आहे.