रेल्वेच्या जनसाधारण तिकीट यंत्रणेतील दोषाचा फटका

रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या खासगी तिकीट विक्री केंद्रांच्या सव्‍‌र्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सोमवारी ही यंत्रणा कोलमडून पडली. त्यामुळे रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवर दिवसभर प्रवाशांची गर्दी लोटत होती. आठवडय़ाचा पहिला दिवस आणि महिनाअखेर असल्याने अनेक प्रवाशांचे महिन्याचे पासही संपत असल्याने अशा प्रवाशांचीही रांग या वेळी मोठी होती.

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि अन्य भागांमध्ये प्रत्येक स्थानकाबाहेर रेल्वेचे पाच ते सहा जनसाधारण तिकीट खिडक्या आहेत. रेल्वेची सर्वाधिक तिकीट विक्री या तिकीट खिडक्यांवरून होते. मात्र सोमवारी अचानक यामध्ये तांत्रिक बिघाड उद्भवल्यामुळे पहाटेपासूनच प्रवाशांना स्थानकातील तिकीट खिडक्यांवर गर्दी करावी लागली होती. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासासाठीसुद्धा प्रवाशांना अर्धा तासाहून अधिक काळ रांगेत उभे राहावे लागत होते. आठवडय़ाचा पहिला दिवस आणि महिन्याची अखेर असल्याने अनेक पासधारकसुद्धा पास काढण्यासाठी तिकीट खिडक्यांवर आल्याने या गर्दीच्या रांगा वाढल्या होत्या.

जनसाधारण तिकीट खिडक्यांवरून रेल्वेला मोठे उत्पन्न मिळत असले तरी त्याकडे पुरेसे लक्ष रेल्वे प्रशासन देत नसल्याने त्याचा फटका जनसाधारण तिकीट खिडकीचालक आणि प्रवासी या दोघांना भोगावा लागतो,’ असे मत विष्णू जाधव या जनसाधारण तिकीट खिडकीचालकाने म्हटले.

मुंबई मुख्यालयातील तिकीटच्या ऑनलाइन सव्‍‌र्हरचे रविवारी रात्री उशिरा काम सुरू होते. त्यामुळे येथील सगळा भार हैदराबाद येथील सव्‍‌र्हरवर टाकण्यात आला होता. त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर सुमारे २५ टक्के जनसाधारण तिकीट खिडक्यांमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. रेल्वे सव्‍‌र्हरशी असलेला संपर्कच तुटल्याने त्यांना तिकीट देणे बंद झाले. जनसाधारण तिकीट खिडक्यांची कामे पूर्वपदावर यावे यासाठी अभियांत्रिकी विभाग कार्यरत आहेत.

नरेंद्र पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे