आदेश धाब्यावर; कारवाईसाठी स्थायी समिती बेमुदत तहकूब ठेवण्याचा पवित्रा 

कल्याण-डोंबिवलीतील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे सुरूअसलेल्या मुख्य व वर्दळीच्या रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसविण्याचा सपाटा ठेकेदार व पालिका अभियंत्यांनी लावला आहे. दीड महिन्यांपूर्वी स्थायी समितीच्या सभेत सिमेंट काँक्रीटच्या रस्ते कामाच्या ठिकाणी व अन्य रस्त्यांवर कुठेही पेव्हर ब्लॉकचा वापर करू नये, असे आदेश स्थायी समितीने प्रशासनाला दिले होते. ते आदेश धाब्यावर बसून प्रकल्प अभियंत्यांनी मनमानी करून पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू ठेवले आहे. जोपर्यंत पेव्हर ब्लॉक का व कशासाठी रस्त्यांवर बसविले, याचे कारण प्रशासन देत नाही आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. तोपर्यंत स्थायी समितीची सभा घेण्यात येणार नाही, असा पवित्रा स्थायी समितीचे सभापती संदीप गायकर यांनी घेतला आहे.

रस्ते, पदपथावर पेव्हर ब्लॉक बसविल्यानंतर त्यावरून सतत वाहने, पादचाऱ्यांची ये-जा सुरू असते. परंतु पेव्हर ब्लॉकचा जमिनीलगतची पकड भक्कम नसल्याने तो सततच्या वर्दळीमुळे सैल होतो आणि काही काळाने तो निघतो. हा अनुभव गेल्या काही वर्षांपासून पालिका प्रशासन घेत आहे. त्यामुळे पेव्हर ब्लॉकवर बंदी घालण्यापर्यंत निर्णय झाले आहेत. कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांवर भविष्यात खड्डे पडू नयेत.

पादचाऱ्यांना चांगले रस्ते उपलब्ध व्हावेत म्हणून सिमेंट रस्त्यांची कामे प्रशासनाने हाती घेतली आहेत. ही कामे योग्य रीतीने सुरू होती. परंतु, प्रकल्प अभियंता म्हणून ‘अकार्यकारी’ पदावरील सुनील जोशी यांना गेल्या महिन्यात आयुक्त ई. रवींद्रन यांनी पदभार देताच, त्यांनी सिमेंट रस्ते कामांमध्ये पुन्हा करण्यास सुरुवात केली असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांच्या आदेशावरून पेव्हर ब्लॉकचा वापर पुन्हा वाढू लागला आहे. सुनील जोशी, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी स्थायी समितीचे आदेश अजिबात पाळत नसल्याचे, असे सभापती गायकर यांनी ‘लोकसत्ता ठाणे’ला सांगितले.

कल्याणमधील शिवाजी चौक ते महमदअली चौक, डोंबिवलीत इंदिरा चौक, रेल्वे स्थानक भागात मोठय़ा प्रमाणात पेव्हर ब्लॉक बसविण्याची कामे ठेकेदाराने हाती घेतली आहेत.

रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते वर्दळीचे असतात. त्यामुळे या भागात सिमेंट रस्ते होणे आवश्यक आहे. असे असतानाही ठेकेदाराने या रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसविण्याचा सपाटा लावला आहे. डोंबिवलीत रेल्वे स्थानकाजवळ पेव्हर ब्लॉक दिसू नयेत म्हणून त्यावर डांबर ओतण्याचा प्रकार अभियंत्यांनी केला आहे. प्रकल्प अभियंता सुनील जोशी यांचे या कामांवर लक्ष नसल्याचे हे लक्षण आहे. त्यांनी प्रकल्प अभियंता म्हणून पदभार घेतल्यापासून पेव्हर ब्लॉकचा वापर वाढला असल्याचे सदस्यांच्या लक्षात आले आहे. ते स्थायी समितीला न जुमानता मनमानीने निर्णय घेत आहेत. ठेकेदारांचे भले करण्याची त्यांची ही खेळी हाणून पाडली जाईल, असा इशारा गायकर यांनी दिला आहे.

करारातच पेव्हर ब्लॉक?

रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचा उल्लेख प्रशासनाबरोबरच्या करारात आहे. पेव्हर ब्लॉक बसवू नका, असे अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेले नाही. त्यामुळे आमचे काम करीत राहणार, असे सिमेंट रस्ते कामाच्या कल्याणमधील ठेकेदाराच्या पर्यवेक्षकाने सांगितले.

काम थांबविणे अशक्य

‘आपल्या आदेशाप्रमाणे यापुढे पेव्हर ब्लॉक बसविण्याचा एकही प्रस्ताव तयार करण्यात येणार नाही. तसेच, अशा कामाला मंजुरी देण्यात येणार नाही. आता पेव्हर ब्लॉक बसविण्याची सुरू असलेली कामे थांबविणे अशक्य आहे. याबाबत आपण स्वत: आपणास भेटून स्पष्टीकरण देणार आहोत,’ असे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी सभापती गायकर यांना पाठविलेल्या लघुसंदेशात म्हटले आहे.