विधी आटोपशीर; सोहळ्यांवरील उधळपट्टीला लगाम

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : टाळेबंदी, जमावबंदीमुळे सर्व प्रकारचे धार्मिक विधी, सार्वजनिक ठिकाणचे उत्सवी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या काळात विवाह सोहळे निश्चित केलेल्या मंडळींची त्यामुळे अडचण झाली असली तरी मोठी आर्थिक बचत होत आहे. घरातच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे उरकले जात आहेत.

मुरबाड, शहापूर परिसरातील अनेक गावांमधील वधू-वराकडील मंडळींनी तीन ते चार महिन्यांपूर्वी विवाहनिश्चिती करून मार्च, एप्रिलमध्ये लग्न सोहळे आयोजित केले आहेत. करोना साथीमुळे विधी करायचे कसे, असे प्रश्न वधू-वरांकडील यजमानांसमोर पडले आहेत. फौजदारी कारवाईची जाणीव असल्याने गुरुजीही यजमानांना लग्न काही दिवस पुढे ढकला किंवा घरातच फक्त पाच वऱ्हाडींच्या उपस्थितीत लग्न करा या अटीवर विवाह लावून देण्याची तयारी दर्शवित आहेत. त्यामुळे अनेकांनी सकाळचा मुहूर्त पाहून वराकडील आई-बाबा, वधूकडचे आई-बाबा आणि विवाह लावून देणारे गुरुजी अशा पाच जणांच्या उपस्थितीत गर्दी न जमविता विवाह कार्यक्रम उरकले आहेत.

भोजनावळी नाही, आहेर नाहीत, मानसन्मान, ध्वनिक्षेपण, वाजंत्री यंत्रणा नाही. हारतुरे, पुष्पगुच्छ नाहीत. असे हे लाखो रुपये खर्च करणारे सोहळे आता अगदी कमी खर्चात होत असल्याने यजमान मंडळी समाधान व्यक्त करीत आहेत. करोना साथ आटोक्यात आल्यानंतर अनेक यजमानांनी नातेवाईक, आप्त यांना गावजेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. कापड, भांडय़ांची दुकाने बंद असल्याने विवाह सोहळ्यातील कन्यादान बंद, वराला कपडे देण्याऐवजी रोख पैसे दिले जात आहेत. फुलांची दुकाने बंद असल्याने घर परिसरातील फुलांच्या माळा करून त्या वधू-वरांच्या गळ्यात घातल्या जात आहेत. विवाहातील मामा, काका, ज्येष्ठ यांच्या भूमिका आई-वडील पार पाडत आहेत. ठाणे जिल्ह्याच्या विविध भागांतून धार्मिक कार्यक्रम, विधी व माहितीसाठी अनेक यजमान आपल्याकडे नियमित येतात. अशा सर्वांना करोना प्रादुर्भाव थांबत नाही तोपर्यंत न येण्याच्या सूचना आपण केल्या आहेत, अशी माहिती मुरबाड सासणे येथील ज्येष्ठ ब्रह्मवृंद अशोकभाई खरे यांनी दिली.

संगमावर शुकशुकाट

मुरबाड तालुक्यातील  काळू-डोईफोडी नदीच्या संगमावर (संगमेश्वर) प्रशसनाने  विवाह, अंत्येष्टीच्या कार्यक्रमांना बंदी घातली आहे. अंत्येष्टीचा दशक्रिया विधी वेळेत होणे आवश्यक असल्याने या विधीसाठी फक्त मयत झालेल्या व्यक्तीच्या घरातील दोन व्यक्ती आणि एक गुरुजी यांनाच संगमस्थानी विधीसाठी परवानगी देण्यात आली आहे. पोलिसांनी या ठिकाणची गर्दी टाळण्यासाठी येथे तळ ठोकला आहे. विधीसाठी आलेल्या तीन व्यक्तींव्यतिरिक्त संगम ठिकाणी आणखी कुणालीही फिरकू दिले जात नाही.

मुरबाड तालुक्यातील ब्रह्मवृंदाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोपर्यंत धार्मिक विधी न करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिशय प्रागतिक असा हा निर्णय सर्वानाच प्रेरणादायी आहे. ब्रह्मवृंदाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून त्यांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल. संगमेश्वर देवस्थान येथे गर्दीचे धार्मिक विधी होणार नाहीत यादृष्टीने दक्षता घेण्यात आली आहे.

– विश्वनाथ केळकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मुरबाड