महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नाटय़कलागुणांना व्यासपीठ

महाविद्यालय स्तरावर तरुणांमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या आणि तरुणांच्या नाटय़कौशल्याला दाद देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय स्पर्धेची ठाणे विभागीय प्राथमिक फेरी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस रंगणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे व्यासपीठ असलेल्या या स्पर्धेत आपली एकांकिका सर्वोत्तम ठरावी, यासाठी सहभागी महाविद्यालये कसून तालिम करत आहेत.

परीक्षकांचे मार्गदर्शन आणि दिग्गज नाटय़कर्मीची उपस्थिती यामुळे आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या सहाव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. यंदाची ठाणे विभागीय प्राथमिक फेरी शनिवार, ७ डिसेंबर आणि रविवार, ८ डिसेंबर रोजी रंगणार आहे. तर प्राथमिक फेरीतून काही निवडक महाविद्यालये विभागीय अंतिम फेरीसाठी निवडली जाणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय आणि नागरी समस्यांवर आधारित विविध एकांकिका यंदाही पाहायला मिळणार आहेत.

राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी आणि कोल्हापूर या आठ विभागीय केंद्रांमध्ये ‘लोकसत्ता लोकांकिका २०१९’ स्पर्धेच्या विभागीय प्राथमिक फेऱ्या रंगणार आहेत. विभागीय प्राथमिक फेरीत निवडली जाणारी काही निवडक महाविद्यालये ही विभागीय अंतिम फेरीत दाखल होणार आहेत. तसेच विभागीय अंतिम फेरीनंतर महाअंतिम फेरी रंगणार आहे. महाअंतिम फेरीसाठी यंदा अभिनेते नसिरुद्दीन शहा हे उपस्थित राहणार आहेत.

प्रायोजक 

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकांकिका’ स्पर्धा ‘अस्तित्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘आयओसीएल’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. लोकांकिके च्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिके त संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.