आर्थिक संकट ओढवल्याचा ताण असह्य़

पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक व्यवहार पुढील सहान महिन्यांसाठी बंद झाल्याने खातेदारांना मोठे संकट ओढवले आहे.  येत्या काळात अवघ्या एक हजार रुपयांमध्ये कसे निभावणार याच चिंतेने  विरारमधील अनेक खातेदारांनी चिंतेचा सूर लावला असताना तणावाखाली  असलेल्या एका खातेदाराला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विरार मनवेलपाडा येथे राहणाऱ्या राजेंद्र वाघोलीकर (वय ५२) यांचा  मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायातून मिळालेला पैसा बँकेत सुरक्षित राहावा, यासाठी त्यांनी  घराजवळील  पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मनवेल पाडा  शाखेत खाते उघडले. पण  मंगळवारी  अचानक बँकेच्या व्यवहारांवर पुढील सहा महिने र्निबध आल्याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर प्राप्त झाला. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने तातडीने बँकेत धाव घेतली.

तेव्हा बँक समोरील गर्दी पाहून त्यांचा छातीत धडकी भरली. जेव्हा सारा प्रकार समोर आला  तेव्हा आता कुटुंबाचे काय होणार, या चिंतेने त्यांच्या अंगाला घाम फुटला व त्यांना अस्वस्थ वाटू लागले.  एक हजार रुपयांत  घर कसे चालवणार याच विचाराने त्यांना हृदय विकाराचा  झटका आला. त्यांना तातडीने महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला पाठवण्यात आले. सध्या त्यांची स्थिती स्थिर असून पुढील उपचार सुरु आहेत. राजेंद्र यांची पत्नी सीमा यांनी माहिती दिली की, मागील काही दिवसापासून मनवेल पाडा परिसरात चोरीच्या घटना वाढत आहेत म्हणून त्यांनी  सर्व पैसे बँकेत ठेवले होते. ते आता मिळणार नसल्याचा ताण त्यांना असह्य़ झाला.