महसुलात घट झाल्याने कल्याण-डोंबिवलीत महत्त्वाच्या विकासकामांवरच भर

कल्याण : वर्षभरानंतर पुन्हा करोना महासाथीची दुसरी लाट सुरू झाल्याने कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात करोनावर मात करण्यासाठी परिपूर्ण आरोग्य व्यवस्था उभारणीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच महामारीमुळे महसुली उत्पन्नावर परिणाम झाल्याने आवश्यक तेवढीच विकासाची कामे करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अर्थसंकल्प सादर करताना स्पष्ट केले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील लोकप्रतिनिधी राजवट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये संपुष्टात आली. तेव्हापासून आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे प्रशासक म्हणून पालिकेचे कामकाज पाहात आहेत. त्यामुळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी पालिकेचा तर, परिवहन महाव्यवस्थापक दीपक सावंत यांनी परिवहन विभागाचा अर्थसंकल्प बुधवारी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांना सादर केला. करोना महामारीमुळे महसुली उत्पन्नावर परिणाम झाल्याने चालू आर्थिक वर्षांचे १७०० कोटी जमेचे आणि १६९९ कोटी खर्चाचे आणि ९९ लक्ष शिलकीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या आरंभीच्या शिलकीसह सुधारित अंदाजपत्रक १५९१ कोटी जमेचे, १२६० कोटी शिलकीचे आणि ३३० कोटी शिलकीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

मागील वर्षभर प्रशासन करोना महासाथीचा सामना करीत आहे. पालिका हद्दीत ६७ हजार रुग्णांवर आतापर्यंत उपचार करण्यात आले आहेत. ६२ हजार रुग्ण बरे झाले आहेत. ३० हजार रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. करोना काळजी केंद्र, उपचार केंद्र, चाचणी केंद्र अशी सुसज्ज यंत्रणा प्रशासनाने उभारली आहे. वर्षभरानंतर पुन्हा करोनाची दुसरी लाट आली असल्याने पालिकेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे लक्ष यंदाच्या अर्थसंकल्पात केले आहे.

प्रशासकीय भवन

कचोरे येथील राखीव भूखंडावर नवीन प्रशासकीय भवन उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. जुन्या जागा विक्रीतून प्रशासनाला ३५० कोटी मिळणार आहेत. दोन्ही शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी ही वास्तू उभी राहणार आहे. नागरी सुविधा केंद्र जुनाट झाल्याने त्यांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. या कामासाठी पाच कोटी खर्च करण्यात येणार आहेत. नवीन प्रशासकीय भवनाच्या बाजूला जैवविविधता उद्यान विकसित केले जाणार आहे.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

पालिकेतील अनेक कर्मचारी वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणी काम करीत असल्याने त्यांच्या कामात सुधारणा व्हावी, त्यांच्यातील शैथिल्य कमी व्हावे या उद्देशातून कर्मचाऱ्यांना पुण्यातील यशदा येथे विशेष प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण मिळावे म्हणून क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहे. यामुळे गुणवंत क्रीडा विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.

जाणकारांचा गट

शहरातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी विविध क्षेत्रांतील जाणकारांचा एक विचार गट स्थापन केला जाणार आहे. हा गट पालिकेला विविध प्रकारचे मार्गदर्शन करून नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी साहाय्य करील. स्मार्ट सिटी प्रकल्पातील कल्याण रेल्वे स्थानक परिसर सुधारणा, वाहतूक दर्शक बसविण्याचे कामे सुरू आहेत. पाणीपुरवठा सुधारण्यासाठी सहा कोटींची तरतूद केली आहे. वाहतुकीत सुसूत्रता येण्यासाठी अद्ययावत वाहनतळ, सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आरोग्य उपाययोजना करोना महासाथीच्या उपाययोजनांसाठी प्रशासनाने आतापर्यंत १३५ कोटी खर्च केले आहेत. दुसऱ्या लाटेसाठी विविध उपाययोजना करावयाच्या असल्याने ९७ कोटी विशेष तरतूद करण्यात आली आहे.

  • प्रभागातील नागरिकांना स्थानिक भागात वैद्यकीय उपचार मिळावेत म्हणून ‘आपला दवाखाना’ उपक्रमातून २५ दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत.
  • शक्तिधाम, टिटवाळा, वसंत व्हॅली, डोंबिवलीतील सुतिकागृह ही नवीन रुग्णालये उभारण्यात येणार आहेत. ही रुग्णालये बा वैद्यकीय सेवेतून परिचलित करण्यात येणार आहेत. या कामासाठी चार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • मूत्रपिंड आजाराच्या रुग्णांसाठी कल्याण-डोंबिवलीत एकूण चार डायलिसिस केंद्र सुरू केली जाणार आहेत.
  • पालिका हद्दीत वैद्यकीय आणि आयुर्वेदिक महाविद्यालय सार्वजनिक, खासगी भागीदारीतून सुरू करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.

उड्डाणपूल

पत्रीपूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. वडवली उड्डाणपूल लवकरच खुला केला जाईल. कोपर उड्डाणपूल येत्या महिन्यात सुरू करण्याचा मानस आहे. वालधुनी नदी पुलावरील एक बाजू वाहनांसाठी खुली केली आहे. दुसरी बाजू मार्च अखेपर्यंत पूर्ण केली जाईल. बावळण रस्ते कामासाठी १३०० मीटर लांबीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे.  उड्डाणपूल भांडवली खर्चाकरिता १० कोटींची तरतूद आहे.

कचरा निर्मूलन

शहर कचरामुक्त करण्यासाठी वर्षभर राबविण्यात आलेल्या शून्य कचरा मोहिमेला रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरात इतरत्र कचरा फेकणाऱ्यांकडून एक कोटी ४० लाखांचा दंड वसूल केला आहे. आधारवाडी कचराभूमी बंद करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सध्या ६५० टनांपैकी फक्त १० टन कचरा आधारवाडी भूमीवर टाकला जात आहे. कचराभूमीवरील साठलेल्या १९ लक्ष मेट्रिक टन कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यासाठी १३७ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. आधारवाडी कचराभूमीची जागा कचरामुक्त झाल्यानंतर तेथे समतल धर्तीवर मनोरंजन केंद्र उभारण्यात येणार आहे.

समूह विकास

एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीत पालिका हद्दीत समूह विकास योजना लागू करण्याची तरतूद आहे. ही योजना पालिका क्षेत्रासाठी लागू करण्यात येणार आहे. या कामासाठी लवकरच समंत्रक नेमण्यात येणार आहे. झोपु योजनेतील वाणिज्य गाळे भाडेपट्टय़ाने देण्यात येणार आहेत. या माध्यमातून ५६ कोटीचे उत्पन्न प्रशासनाला मिळणार आहे.

आर्थिक शिस्त

टाळेबंदीमुळे महसुली उत्पन्नावर परिणाम झाल्याने आर्थिक शिस्त पाळून विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. उधळपट्टी कामांना आवर घातला जाणार आहे.  शासन स्तरावर अनुदान मिळण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. कामाची गरज पाहून विकासकामे हाती घेतली जातील.

कर देयक

यापुढे पाणी देयक वसुलीचे काम मालमत्ता कर विभागाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकच विभागातील कर्मचारी यापुढे करवसुलीचे काम करणार असल्याने वसुली योग्यवेळी होणार आहे. जीएसटीतून पालिकेला ३०८ कोटीचे अनुदान अपेक्षित आहे.

करवसुली उद्दिष्ट

  • मालमत्ता कर  : ३६० कोटी
  • पाणीपट्टी : ७० कोटी २५ लाख
  • विशेष अधिनियम वसुली : २५४ कोटी
  • विकासकामांसाठी शासनाकडून येणे बाकी : १५३ कोटी
  • अमृत योजनेतून : ६८ कोटी येणे
  • १५ वा वित्त आयोग : ५० कोटी अनुदान अपेक्षित