ठाणे शहरातील अधिकृत जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासात अडसर ठरत असलेल्या ३४ रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या प्रस्तावास अखेर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे शहरातील नौपाडा, कोलबाड, राबोडी आणि कळवा भागांतील सुमारे पाच हजारांहून अधिक अधिकृत जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळणार आहे.

ठाण्यातील नौपाडा, उथळसर, खारटन रोड, चरई, कोलबाड आणि राबोडी हे परिसर जुने ठाणे म्हणून ओळखले जातात. महापालिकेच्या विकास आराखडय़ानुसार या भागात सहा मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते आहेत. या अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होतेच. पण, राज्य सरकारने तयार केलेल्या नव्या विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) धोरणामुळे येथील अधिकृत इमारतींचा पुनर्विकास रखडला होता. जुन्या ठाण्यातील दोन इमारतींमधील रस्ता किमान नऊ  मीटरचा हवाच, असा नियम राज्य सरकारने काढला होता. या नियमामुळे येथील इमारतींचा पुनर्विकास रखडला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील अशा रस्त्यांची यादी तयार करून ते नऊ मीटरचे करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. कळवा परिसरातही अशीच काहीशी परिस्थिती होती. त्यामुळे या प्रस्तावात कळव्याचाही समावेश करण्यात आला होता. एकूण ३४ रस्त्यांचा हा प्रस्ताव होता.

त्यास सर्वसाधारण सभेने मान्यता देऊन शासनाच्या नगरविकास विभागाकडे मान्यतेसाठी पाठविला होता. त्यास नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असून यामुळे येथील अधिकृत जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.