|| किशोर कोकणे

भूमाफियांकड़ून मुंब्रा ते दिवा दोन किमी रस्त्याची बांधणी; पर्यावरणप्रेमींकडून संताप

 

ठाणे : मुंब्रा येथील देसाई खाडीत भूमाफियांनी खारफुटींची कत्तल करून मुंब्रा ते दिवा यांना जोडणारा दोन किलोमीटर लांबीचा रस्ता बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात हा रस्ता बांधण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील खारफुटींचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच खाडीकिनारी असलेल्या खारफुटींचे क्षेत्र हे राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. याच खाडीचा काही भाग फ्लेमिंगो अभयारण्यासाठी आरक्षित करण्यात आला असून काही क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील गटात राखीव ठेवण्यात आले आहे. राज्याच्या पर्यावरण विभागाचा कार्यभार आदित्य ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी खारफुटी संवर्धनासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याच्या सूचना संबंधित विभाग तसेच जिल्हा प्रशासन स्तरावर केल्या. या प्रयत्नांमुळे राज्यासह ठाणे जिल्ह्यातील खारफुटी क्षेत्राला मोठे संरक्षण मिळेल, अशी आशा एकीकडे पर्यावरणप्रेमींमध्ये व्यक्त होत होती. त्याच वेळी दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील ठराविक भागात राजरोसपणे खारफुटी कापली जात असल्याचे चित्र आहे.

 

नवा रस्ता, नवी बांधकामे

ठाणे शहराला लागून असलेल्या मुंब्रा आणि दिवा शहराला जोडणारा मुंब्रा चूहा पूल ते दिवा येथील साबेगावपर्यंत दोन किलोमीटर लांबीचा रस्ता खारफुटी कापून भूमाफियांनी तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही खारफुटी कापून १० हजारांपेक्षा अधिक ट्रकभर राडारोडा येथे टाकण्यात आल्याचा अंदाज पर्यावरणवादी संघटनांकडून केला जात आहे. हा रस्ता रुंदीलाही मोठा आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला काही गाळेही उभारण्यात आले आहेत. मुंब्रा येथून थेट दिव्याला जोडणारा हा रस्ता असल्याने वाळू माफिया, रेती उपसा करणाऱ्यांसाठी हा रस्ता तयार केला गेला असावा, असे मत पर्यावरणवादी कार्यकर्ते व्यक्त करत आहे.

 

याआधीही प्रयत्न…

यापूर्वी २०१० मध्ये याच ठिकाणी रस्ता उभारण्याचा प्रयत्न भूमाफियांकडून झाला होता, पण हा प्रयत्न पर्यावरणवादी संघटनांनी हाणून पाडला होता. त्यानंतर २०१७ मध्ये चूहा पूल येथे काही प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले होते. मात्र, दोन वर्षांमध्ये भूमाफियांनी मातीचा भराव, राडारोडा टाकून दोन किलोमीटरपर्यंत खाडी बुजवली आहे.

हेच का संवर्धन?  जिल्ह्यात पहिल्यांदाच एखाद्या विभागात इतक्या मोठ्या प्रमाणात खारफुटींची कत्तल झाली असल्याचा अंदाज आहे. खारफुटी संवर्धनासाठी राज्य तसेच जिल्हास्तरावर नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जात असतानाही हा प्रकार घडल्याबाबत पर्यावरणप्रेमी संताप व्यक्त करत आहेत.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष?  टाळेबंदीच्या कालावधीत हा रस्ता तयार करण्यात आल्याची माहिती पर्यावरण कार्यकर्त्यांनी दिली. ठाणे महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे डोळेझाक केल्याचे चित्र असून आयुक्त डॉ.विपीन शर्मा आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अखत्यारीत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेविषयी यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

यासंदर्भात कोकण आयुक्त तसेच राज्य खारफूटी संवर्धन कक्षाकडे तक्रार करण्यात आली आहे. भूमाफियांवरील राजकीय आशिर्वादाशिवाय इतका मोठा रस्ता तयार होणे शक्य नाही. प्रशासनाने या ठिकाणी जाऊन पाहणी करणे गरजेचे आहे. तसेच या प्रकरणातील दोषी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. – रोहित जोशी, पर्यावरणवादी कार्यकर्ते.

 

तलाठ्यांना यासंदर्भात जागेची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कारवाई करण्यात येईल. – युवराज बांगर, तहसीलदार.