‘इंद्रधनु संस्थे’तर्फे आज मुलाखतीचा कार्यक्रम

ठाणे : ग्रामीण भागात राहणाऱ्या तसेच अशिक्षित असलेले राहीबाई पोपेरे यांनी पांरपरिक बियाण्यांची बँक तयार केली असून त्यांच्या कार्याची जगभरात दखल घेतली जात आहे. त्यांच्या या प्रवासाची कहाणी ऐकण्याची संधी ठाणेकरांना आज, शुक्रवारी मिळणार आहे. ठाण्यातील सहयोग मंदिर सभागृहात शुक्रवारी इंद्रधनु आणि जोशी इंटरप्रायझेस यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोकसत्ता प्रस्तुत ‘बीज अंकुरे अंकुरे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये राहीबाई पोपेरे यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत घेणार आहे.

अहमदनगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावात राहीबाई पोपेरे राहतात. त्यांनी काही वर्षांपूर्वी घरामध्येच दुर्मीळ आणि पारंपरिक बियाणे जमवण्यास सुरुवात केली. हे सर्व बियाणे जपून ठेवण्यासाठी त्यांनी पारंपरिक पद्धती आणि मातीच्या मडक्याचा उपयोग केला. अशी लाखो दुर्मीळ बियाणे आज त्यांच्या बियाणे बँकेत सुरक्षित आहेत. राहीबाई एवढेच करून थांबल्या नसून त्यांनी त्यांच्या परिसरात असणाऱ्या तीन हजार महिला आणि शेतकऱ्यांचा बचतगट स्थापन केला. या गटाच्या माध्यमातून ही सर्व मंडळी पारंपरिक बियाण्यांचा वापर करून शेती करीत आहेत. एखाद्या आंतरराष्ट्रीय बियाणे कंपनीकडे उपलब्ध नसतील, अशी बियाणे आज राहीबाईंकडे उपलब्ध आहेत. त्यांच्या बियाणे बँकेला कृषीविषयक अभ्यास करणारे शेकडो विद्यार्थी भेट देत आहेत. राहीबाईंच्या या कामाचा लौकिक जगभर पसरला असून भारत सरकारने त्यांची पद्मश्री पुरस्कारासाठी नुकतीच निवड केली आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाची कहाणी थक्क करणारी आहे. अनेक आव्हानांना तोंड देणाऱ्या राहीबाईंच्या जिद्दीचा प्रवास आज, शुक्रवारी उलगडणार आहे. ठाण्यातील सांस्कृतिक चळवळीत मोलाचा वाटा असणाऱ्या इंद्रधनु आणि जोशी इंटरप्रायझेस यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोकसत्ता प्रस्तुत ‘बीज अंकुरे अंकुरे’ या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत हे राहीबाईंची मुलाखत घेणार आहेत. यानिमित्ताने राहीबाईंचा आतापर्यंतच्या प्रवासाची काहाणी ऐकण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे. या वेळी दुर्मीळ बियाण्यांविषयीची तांत्रिक माहिती बी.ए.आय.एफ. संस्थेचे जितिन साठे हे उपस्थितांना देणार आहे. हा कार्यक्रम विनाशुल्क आहे.

शुक्रवार, १३ मार्च. वेळ – सायंकाळी ७ वाजता

सहयोग मंदिर, घंटाळी, नौपाडा, ठाणे (प.).