News Flash

वेळापत्रक नवे, हाल जुनेच!

दिवा रेल्वे स्थानकात यापूर्वी १२ अप आणि १२ डाऊन अशा २४ फेऱ्यांना थांबा देण्यात आला होता.

१ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या नव्या वेळापत्रकानुसार दिवा स्थानकात ४६ जलद गाडय़ांना थांबा देण्यात आला

दिव्यातील ‘जलद’ थांबा प्रवाशांसाठी निरुपयोगी

वाढत्या प्रवासीसंख्येच्या प्रमाणात जास्त सुविधा देण्याच्या हेतूने मध्य रेल्वे प्रशासनाने दिवा स्थानकात सुरू केलेला जलद गाडीचा थांबा दिवावासीयांसाठी कुचकामी ठरत आहे. १ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या नव्या वेळापत्रकानुसार दिवा स्थानकात ४६ जलद गाडय़ांना थांबा देण्यात आला असला तरी, यातील ७० टक्के गाडय़ा कर्जत-कसारा येथून सुटणाऱ्या किंवा तेथे जाणाऱ्या आहेत. या गाडय़ांना आधीच तुडुंब गर्दी असल्याने त्या दिवा स्थानकात थांबून देखील येथील प्रवाशांना त्यात चढणे अशक्य ठरत आहे.

दिवा रेल्वे स्थानकात यापूर्वी १२ अप आणि १२ डाऊन अशा २४ फेऱ्यांना थांबा देण्यात आला होता. १ नोव्हेंबरपासून रेल्वेने वेळापत्रक बदलले असून आणखी २२ जलद गाडय़ांना स्थानकात थांबा मिळाला आहे. मात्र, यातील ७० टक्के गाडय़ा या कर्जत, खोपोली, कसारा, आसनगाव येथून सुटणाऱ्या असल्याने त्यांचा दिव्यातील प्रवाशांना फारसा उपयोग नाही. कारण अप मार्गावर डोंबिवली तर डाऊन मार्गावर ठाणे स्थानकातच पूर्णपणे भरतात. तुडुंब भरलेल्या या गाडीत दिव्यातील प्रवाशांना शिरायला जागाच नसते. त्यामुळे दिव्यातील जलद गाडय़ांचा थांबा कुचकामी ठरला आहे.

ठाण्यात मोठय़ा प्रमाणात कंपन्या आणि उद्योग असल्याने कर्जत, अंबरनाथ, कसारा येथील अनेक जण येथे कामानिमित्ताने येत असतात. त्यामुळे  परतीच्या प्रवासावेळी ठाण्यातून चढणारा प्रवाशांचा लोंढा चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या दिव्यातील प्रवाशांची वाट अडवतो. परिणामी परतीच्या जलद गाडय़ांचाही दिवावासीय प्रवाशांना उपयोग होत नाही.

बदलापूरपेक्षा दिव्यात अधिक गर्दी 

गेल्या काही वर्षांमध्ये दिवा शहरात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण खूप वाढले आहे. किफायतशीर किमतीतील घरांमुळे नोकरदार मोठय़ा प्रमाणात दिव्यात आले. २०१६-१७ ला मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या सर्वाधिक गर्दीच्या रेल्वे स्थानकात दिव्याचा आठवा क्रमांक लागतो. गर्दीच्या स्थानकांमध्ये दिव्याने बदलापूर, शीव आणि विक्रोळी स्थानकांनाही मागे टाकले आहे.

अप मार्गाने जाणाऱ्या गाडय़ा

* कसारा- ८, कर्जत- ५, खोपोली- १, आसनगाव- १, अंबरनाथ-३, बदलापूर- ४  (यात दादर- १), कल्याण- १

* डाऊन मार्गाने जाणाऱ्या गाडय़ा

* कर्जत- ६, कसारा- ५, बदलापूर- ५, अंबरनाथ- ३, टिटवाळा-२, खोपोली-१, आसनगाव-१

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 4:47 am

Web Title: rail commuters not able to catch fast local at diva station due to heavy rush
टॅग : Diva Station
Next Stories
1 खाऊखुशाल : पारंपरिक लाडू मिठाईच्या पंगतीत
2 लसीकरणामुळे मूल नपुंसक होण्याची अफवा
3 साखरेचे खाणार..
Just Now!
X