घोडबंदर परिसरात रहिवाशांची कोंडी; जीवनावश्यक वस्तू खरेदीतही अडवणूक

ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली, वाघबीळ, मानपाडा, कोलशेत, बाळकूम, कापूरबावडी, ढोकाळी, मनोरमानगर भागात काही राजकीय पुढारी आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येत जाहीर केलेल्या अनधिकृत टाळेबंदीमुळे या भागातील रहिवाशांची संपूर्ण टाळेबंदीआधीच घरकोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. पुढील दहा दिवस ठाणे शहर बंद असल्यामुळे नागरिक बुधवारी वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडले खरे; मात्र राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि तथाकथित स्वयंसेवकांनी अनेकांची वाट रोखून धरली. त्यामुळे पुढील दहा दिवस पुरेल इतके तरी अन्नधान्य, वस्तू आम्हाला भरू द्या, असे आर्जव येथील रहिवासी करताना दिसत होते.

ठाणे शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गेल्या दोन दिवसांपूर्वीपासून ठाण्यात टाळेबंदी लागू होईल की नाही या संभ्रमावस्थेत येथील नागरिक होते. मात्र, महापालिकेकडून आदेश येण्यापूर्वीच घोडबंदर येथील कासारवडवली, मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर, कोलशेत, ढोकाळी, बाळकूम, हायलँड, कापूरबावडी या भागांत २९ जून ते ५ जुलैपर्यंत येथील राजकीय आणि काही ग्रामस्थांनी स्वयंघोषित टाळेबंदी लागू केली आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. दुकाने बंद ठेवण्याबाबत योग्य ती ‘समज’ व्यापाऱ्यांना देण्यात आल्याने या भागात गेल्या काही दिवसांपासून कडेकोट बंद आहे. येथील काही गावांमध्ये ग्रामस्थांनी सीमाही बंद केल्या आहेत. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून या भागांतील सर्व दुकाने बंद आहेत. सुरुवातीला येथील नागरिकांनीही या बंदला पाठिंबा दिला होता. मात्र, मंगळवारी ठाणे महापालिकेने २ ते १२ जुलैपर्यंत ठाण्यात संपूर्ण टाळेबंदीचे आदेश काढल्यानंतर आता नागरिकांमध्ये टाळेबंदीची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे बुधवारी सकाळपासून या भागातील नागरिकांची वस्तू खरेदीसाठी धावपळ सुरू झाली होती. खरेदीसाठी फक्त एकच दिवस शिल्लक असल्याने येथील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने काही काळासाठी तरी खुली करण्यात येतील असे येथील नागरिकांना वाटत होते. मात्र, बुधवारीही येथील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने पूर्णपणे बंद होती. याचा फटका येथील नागरिकांना सहन करावा लागला आहे. १२ दिवस टाळेबंदी असल्याने अनेकांना भाजी खरेदीसाठी थेट ठाणे भाजी मंडई गाठावी लागली. त्यातही दुचाकीवर केवळ चालकाला परवानगी असल्याने घरातील एकाच व्यक्तीला सामान खरेदी करण्यासाठी जावे लागले. त्यामुळे अनेकांना कमी प्रमाणात वस्तू मिळाल्या.

ढोकाळी आणि कासारवडवली येथील नाक्यावर डी मार्ट आहे. या डी मार्टमध्येही सुरुवातीला टोकन दिला जात होता. या टोकनवर असलेल्या वेळेनुसार नागरिकांना येण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. त्यामुळे डी मार्टमध्येही नागरिकांची वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती.