कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्याने काय परिणाम होऊ शकतो, याचे प्रत्यंतर सध्या ठाणे आणि आसपासच्या शहरांतील कचराभूमींना लागलेल्या आगींच्या घटनांतून दिसून येत आहे. दिवा, डायघर, अंबरनाथ, आधारवाडी येथील कचराभूमींना वारंवार आगी लागत असतात. कल्याणमधील आधारवाडी परिसरातील नागरिकांना तर कचऱ्याच्या आगीमुळे जीव नकोसा झाला आहे.

ठाण्याकडून भिवंडीमार्गे कल्याण शहराकडे येताना दुर्गाडी पूल ओलांडल्यानंतर एक विशिष्ट दुर्गंधी येणाऱ्या संकटाची जाणीव करून देते. वर्गीकरण अथवा कोणतीही प्रक्रिया न करता वर्षांनुवर्षे एका ठिकाणी कचरा टाकत राहिले तर काय होते, याचे ज्वलंत उदाहरण इथे पाहायला मिळते. आधारवाडी येथील कचराभूमीवर आता चक्क कचऱ्याचा डोंगर झाला आहे. परिसरातील राहणाऱ्या कल्याणकरांना याची सवय झाली असली तरी नव्याने शहरात येणाऱ्यांना याचा त्रास जाणवतो. या परिसरातील तरुणांची लग्ने या कचऱ्याच्या डोंगरामुळे अडचणीत आली आहेत. कचऱ्याचा डोंगर त्यांच्या लग्नातील मोठे विघ्न ठरू लागला आहे. अनेकजण येथील सदनिका मिळेल त्या किमतीला विकून अन्यत्र स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही परिस्थिती केवळ कल्याण शहरापुरती मर्यादित नाही. तसेच बदलापूर, अंबरनाथ या शहरांच्या वेशीवरदेखील कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. ठाणे महापालिकेच्या हद्दीतील दिवा, डायघर या भागांतही कचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले आहेत. एकंदर संपूर्ण जिल्ह्य़ाचे कचरा व्यवस्थापनाच्या आघाडीवर स्थानिक यंत्रणांना अपयश येत असून कल्याण तर धुमसू लागले आहे.

खरे तर आधारवाडी कचराभूमीची कचरा सामावून घेण्याची क्षमता कधीच संपली आहे. तरीही अन्य पर्याय उपलब्ध होत नसल्याने वर्षांनुवर्षे इथे कचरा टाकला जातो. कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास स्थानिक प्रशासनाला अपयश आल्याने उच्च न्यायालयाने शहरातील नव्या बांधकामांवर बंदी घातली होती. मात्र त्यानंतरही कचऱ्याची सुयोग्य विल्हेवाट लावण्यात महापालिकेला अपयश आले आहे. गेल्या महिनाभरात उद्भविलेला प्रसंग हा या साऱ्या अनास्थेचा परिणाम आहे. आधारवाडी कचराभूमीला लागलेल्या आगीचे स्वरूप अतिशय भीषण होते. अग्निशमन विभागाचे १५ बंब आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत होते. तरीही आग आटोक्यात येण्यास पाच ते सहा दिवस लागले. या आगीमुळे निघालेला काळा धूर परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये घुसला. त्यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. खोकला, सर्दी, डोकेदुखी, मळमळ, अंगाला खाज येणे अशा प्रकारच्या आजारांचे प्रमाण वाढले. कल्याणची ही कचराभूमी तात्काळ बंद करावी. तरच या परिसरातील नागरिक आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतील, असे येथील वैद्यकीय व्यावसायिकांचे मत आहे.

आधारवाडी कचराभूमीला गेल्या वर्षभरामध्ये नऊ  ते दहा वेळा आगी लागल्या आहेत. चाळीस वर्षे एकाच ठिकाणी कचरा साठून राहिल्याने, तो पूर्ण वाळून कोळसा झाला आहे. हा कचरा म्हणजे एक प्रकारचे इंधन आहे. त्यामुळे कचराभूमीवरील विशिष्ट घटकांचा संयोग होऊन मिथेनसारखा तात्काळ पेट घेणारा वायू या ठिकाणी तयार होतो आणि त्यातून या आगी लागतात. काही वेळा भंगारवाले आगी लावतात. कचराभूमीच्या भागात शाळा, महाविद्यालये आहेत. विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. कचऱ्याने पेट घेतल्यानंतर येणारी दुर्गंधी आणि धुरांचा वास गुदमरून टाकणारा असतो. याच कचराभूमीला खेटून असलेल्या सोनावणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तर हा त्रास अधिक तीव्रतेने जाणवतो. सकाळी वास काहीसा कमी होतो असे वाटते आणि दुपारी अचानक कचऱ्याला आग लागते. धुराच्या लोटांनी परिसर एकदम व्यापून जातो. वर्गामध्ये बसल्यानंतर समोरचे काही दिसत नाही इतका धूर महाविद्यालयामध्ये घुसतो. त्याक्षणी महाविद्यालयातून पळून जावेसे वाटते. या महाविद्यालयात तृतीय वर्ष बीएस्सी शिकणारा अक्षय पतंगराव त्याचे अनुभव सागतो. याच महाविद्यालयात शिकणारी पूजा शेट्टी म्हणते, आत्तापर्यंत प्रदूषणाविषयी केवळ शाळेत ऐकले होते, मात्र महाविद्यालयात ते असे पाहायला आणि अनुभवायलाही मिळाले.

केवळ कागदोपत्री उपाय..

प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही वर्षांपूर्वी कल्याण- डोंबिवली पालिकेला पत्र पाठवून आधारवाडी कचराभूमी बंद करण्याचे आदेश दिले होते. तरीही प्रशासन, लोकप्रतिनिधी विविध कारणे देत आधारवाडी कचराभूमी कचऱ्यासाठी कशी योग्य आहे, असे वेळोवेळी दावे करत आहे. पालिका शहरातील कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावत नाही, म्हणून दक्ष नागरिक कौस्तुभ गोखले यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने पहिला कचऱ्याचा प्रश्न सोडवा, मग नवीन बांधकामांचा विचार करा, असे पालिकेला सुनावून एक वर्षभर पालिका हद्दीतील नवीन बांधकामांना बंदी घातली होती. मात्र त्यापासून महापालिका प्रशासनाने कोणताही धडा घेतला नाही. त्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले. आता तरी या प्रकरणी ठोस उपाययोजना केल्या जाव्यात, अशी अपेक्षा कल्याणकर व्यक्त करीत आहेत.