धोकादायक प्रवास; रिक्षा, खासगी वाहनांत क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी खासगी वाहने तसेच रिक्षांमधून धोकादायकरीत्या विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहनांमध्ये बसवून वाहतूक केली जात असून त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होते आहे. दरम्यान या प्रकाराकडे वाहतूक पोलीसही कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे.

चौथी मुंबई म्हणून नावारूपाला येणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अनेक नामांकित शाळा आहेत. राष्ट्रीय स्तरावर साखळी स्वरूपात असलेल्या शाळांच्या शाखाही अंबरनाथ आणि बदलापुरात आहेत. त्यामुळे घरापासून कितीही अंतर असले तरी अशा शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची स्पर्धा असते.  घरापासून दूर असलेल्या या शाळांमध्ये पोहोचण्यासाठी अनेक पालक शाळेच्या बसव्यतिरिक्त खासगी वाहनांचा वापर करतात. त्यात व्हॅन, रिक्षा आणि खासगी मिनी बसचा समावेश असतो. मात्र या वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. खासगी रिक्षा आणि व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा तिप्पट ते चौपट विद्यार्थी भरलेले असतात. अनेकदा विद्यार्थ्यांचे निम्मे शरीर रिक्षाच्या बाहेर आलेले असते. तर अनेक चारचाकी वाहनांमध्ये मोठय़ा विद्यार्थ्यांच्या मांडीवर छोटय़ा विद्यार्थ्यांना बसवले जाते. तीन आसनी रिक्षात आठ ते दहा विद्यार्थी बसवल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते आहे. तर चारचाकी व्हॅनमध्ये दहा ते बारापर्यंत विद्यार्थी अशा वाहनांमध्ये बसवले जात असल्याचे पाहायला मिळते. अनेक विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या बॅग रिक्षाच्या दोन्ही बाजूंना लटकवण्यात आलेली असतात. त्यामुळे जर चुकून अचानक आलेल्या खड्डय़ामुळे किंवा वाहनामुळे रिक्षाचा तोल गेल्यास वाहन पलटण्याचा धोकाही अधिक आहे. मात्र पैशांसाठी अनेक रिक्षाचालक विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा समोर आले आहे.

विशेष म्हणजे अंबरनाथ पश्चिमेत वाहतूक पोलिसांचे कार्यालय आहे. त्याच कार्यालयासमोरून मोठय़ा प्रमाणावर अशा क्षमतेपेक्षा अधिक भरलेल्या वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते आहे. त्यामुळे अशा वाहतुकीवर वाहतूक पोलीसच कानाडोळा तर करत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

रिक्षा आणि व्हॅनच्या क्षमतेपेक्षा एक अधिक प्रवासी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाऊ  शकते. मात्र क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक चुकीची आहे. या बाबत पालकांनीही काळजी घ्यावी.

संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

अशा वाहनांवर कारवाई सुरू असते, तरीही असा प्रकार समोर येत असल्यास त्यावरही कारवाई केली जाईल.

– प्रदीप गोसावी, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग