डोंबिवलीतील गणेश मंदिराजवळ एकच रस्ता दोन ठिकाणी बंद

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील श्री गणेश मंदिर ते स. वा. जोशी शाळेदरम्यानचा नेहरू रस्ता दोन ठिकाणी बंद केला आहे. आता टाळेबंदी शिथिल केल्यानंतरही रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. त्यामुळे उद्योजक, व्यावसायिकांना मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, अंबरनाथ भागातील कामाच्या ठिकाणी वाहन घेऊन जाता येत नाही. त्यांना घरातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे.

गणेश मंदिराच्या पाठीमागील बाजूस सात ते आठ इमारती आहेत. मागील दोन महिन्यांत या भागात एकही करोनाचा बाधित, संशयित रुग्ण सापडलेला नाही. तरीही हा रस्ता या भागातील रहिवासी रस्त्यावर येणारच नाहीत अशा पद्धतीने महापालिका, पोलिसांनी बंद केला आहे. गणेश मंदिर दोन महिन्यांपासून दर्शनासाठी बंद आहे. भाविक येथे येण्याचा प्रश्न नाही. नेहरू रस्ता, फडके रस्ता हे सर्वाधिक वर्दळीचे रस्ते असल्याने हे रस्ते बांबू लावून बंद करण्यात आले आहेत. अशा प्रकारे रस्ते बंद करण्यास या भागातील रहिवाशांचा विरोध नाही. फक्त एकच रस्ता रहिवाशांची अडचण होईल अशा पद्धतीने बंद करून ठेवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न येथील रहिवासी करीत आहेत. आम्ही आमची वाहने घेऊन फिरायला नाही तर शासनाने दिलेल्या अटीशर्तीच्या अधीन राहून उद्योग, व्यवसाय करण्यासाठी जातो, असे येथील उद्योजक, घाऊक व्यापारी, व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

मागील पंधरा दिवसांपासून या भागातील रहिवासी पालिका, पोलिसांना, आमदार रवींद्र चव्हाण यांचे कार्यालय, स्थानिक नगरसेविका खुशबू चौधरी यांच्याशी संपर्क साधत आहेत. मात्र रहिवाशांच्या या तक्रारीची कोणीही दखल घेत नाही.

फक्त शनिवारी संध्याकाळी या ठिकाणचे अडथळे काढण्यात आले होते. ते पुन्हा बांधून रस्ता बंद करण्यात आला, असे येथील रहिवाशांनी सांगितले. सहा ते सात इमारती बंदिस्त करून पालिका, पोलीस नक्की काय साध्य करत आहेत. बंद केलेला रस्ता जोशी शाळेजवळील रोहित्राजवळ बंद करावा त्याला आमची हरकत नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्याला पोलीस, पालिका अधिकारी दाद देत नसल्याचे कळते. गेल्या काही दिवसांपासून हे वादावादीचे प्रकार या भागात सुरू आहेत.

आम्ही राहत असलेल्या भागात करोनाबाधित, संशयित रुग्ण नाही. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रस्ता बंद करण्याला आमचा विरोध नाही. फक्त सध्या ज्या पद्धतीने रस्ता बंद केला त्यामुळे वाहन सोसायटीतून बाहेर काढताना कसरत करावी लागते. हा रस्ता जोशी शाळेजवळील रोहित्राजवळ बंद करावा किंवा स्टेशनकडील भागात बंद करावा, असे सुचवूनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहोचणे अवघड होते.

– संदीप घरत, रहिवासी