15 August 2020

News Flash

आचारसंहितेत रस्त्यांच्या निविदा

बकाल वाहतूक व्यवस्था आणि अरुंद रस्ते यांमुळे भिवंडी परिसरातील नागरिका त्रस्त आहेत.

भिवंडीतील गोदाम परिसरात अवजड वाहनांची वर्दळ अधिक आहे. मात्र, अरुंद रस्त्यांमुळे येथे नियमित कोंडी होते.

आशीष धनगर

भिवंडीतील गोदाम परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण; ‘एमएमआरडीए’च्या निर्णयामुळे चर्चेला उधाण

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून भिवंडी परिसरात प्रशस्त रस्ते बांधण्याच्या कामांसाठीच्या २१ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. २०१६मध्ये झालेल्या नोटाबंदीमुळे भिवंडीतील यंत्रमाग उद्योगाला बसलेला फटका लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी त्रासदायक ठरेल, असे चित्र असतानाच या उद्योगांच्या परिसरातच रस्ते उभारण्याच्या निविदा मतदारांसाठी आमिष तर नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

भिवंडी परिसरासाठी महत्त्वाचा ठरणारा धामणकर नाका ते भाजी मंडई, जामा मस्जिद ते सईदी हॉटेल आणि दर्गा रोड ते कारावली या तीन महत्त्वाच्या रस्त्यांचे येत्या १८ महिन्यांत रुंदीकरण तसेच काँक्रीटीकरण करण्यात येणार असून या नियोजित प्रकल्पांचा पुरेपूर वापर प्रचारातही होऊ लागल्याचे चित्र आहे.

बकाल वाहतूक व्यवस्था आणि अरुंद रस्ते यांमुळे भिवंडी परिसरातील नागरिका त्रस्त आहेत. एमएमआरडीएने गेल्या काही वर्षांत येथील  रस्ते व अन्य पायाभूत सुविधांची कामे सुरू केली आहेत. मात्र, मूळ समस्या कायम असल्यामुळे हाच मुद्दा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने प्रचारात हाती घेतला आहे. नोटाबंदीमुळे भिवंडीतील यंत्रमाग उद्योगाचे मोठे नुकसान झाले व अनेक कामगारांच्या नोकऱ्या गेल्याचा मुद्दाही भाजपच्या विरोधात वापरण्यात येत आहे. असे असतानाच एमएमआरडीएने रस्त्यांच्या कामाच्या निविदा काढून भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यासाठी अनुकूल वातावरण तर तयार केले नाही ना, अशी चर्चा सुरू आहे.

भिवंडी शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणतर्फे निविदा मागवण्यात आली आहे.  शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण करण्यात येणार असून पर्जन्य जलवाहिन्या बसवण्याचे काम करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीए प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी भिवंडी शहरातील विविध १२ रस्त्यांच्या कामांना अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून तेथील कामाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर शहरातील सहा मुख्य रस्त्यांच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी धामणकर नाका ते भाजी मंडई, जामा मज्जीद ते सईदी हॉटेल आणि दर्गा रोड ते कारावली गाव या मुख्य तीन रस्त्यांसाठीची निविदा मागवण्यात आल्याचे एमएमआरडीए प्रशासनाने सांगितले. यंत्रमाग आणि लघु उद्योगाचे शहर असलेले भिवंडी शहर हे मुंबई आणि ठाणेनजीकचे महत्त्वाचे शहर आहे. या शहरात अनेक गोदामेही आहेत. येथील गोदामांमध्ये या शहरात सतत मोठय़ा मालवाहू गाडय़ांचा राबता असतो. देशभरातून विविध मालवाहू गाडय़ा भिवंडी शहरात येतात. अरुंद आणि निकृष्ट असलेल्या या रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीची प्रमाण या भागात वाढले होते. त्यामुळे या रस्त्यांची कामे येथील व्यापार, उद्योगासाठी महत्त्वाची ठरणार आहेत.

अतिक्रमणे हटवण्याचे आव्हान

रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामाकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि भिवंडी निजामपूर महापालिका यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या कराराअंतर्गत रस्त्यांची लांबी आणि रुंदी ही भिवंडी महापालिकेने ठरवणार आहे. त्या रुंदीकरणाच्या जागेत काही अतिक्रमणे असतील, तर ती अतिक्रमणाची कामे हटवण्याची जबाबदारी ही भिवंडी महापालिकेची असणार आहे. अतिक्रमणे हटवल्यानंतरच रस्त्याची लांबी रुंदी वाढवणे शक्य होणार असल्याचे मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले आहे.

भिवंडी शहरातील महत्त्वाच्या रस्त्याच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या कामांना यापूर्वीच मंजुरी मिळाली होती. आता केवळ निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आचारसंहितेचा अडसर ठरण्याचा प्रश्न नाही. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा फायदा भिवंडीतील नागरिक आणि लघुउद्योजकांना होणार आहे

-दिलीप कवठकर, जनसंपर्क अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 12:21 am

Web Title: road tender in the model code of conduct
Next Stories
1 कसारा घाटात महामार्गावर बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल
2 ‘टर्फ’मुळे खेळाडू रस्त्यावर!
3 उद्यानांत अद्याप जुनेच ठेकेदार
Just Now!
X