संस्कृत भाषा ही आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा अमोल ठेवा आहे. ही भाषा जगातील सर्वात प्राचीन भाषा मानली जाते. देवांची भाषा, गिर्वाण भारती अशा नावांनीही संस्कृत भाषेला ओळखले जाते. एकेकाळी हीच संस्कृत भाषा भारतीयांची लोकभाषा/व्यावहारिक भाषा होती. काळाच्या ओघात ही भाषा हळूहळू व्यवहारात मागे पडली असली तरी आजच्या आधुनिक युगातही तिचे महत्त्व कमी झालेले नाही. युवा पिढीतही या भाषेची आवड निर्माण झाली असून या भाषेचा अभ्यास करण्याकडे कल वाढला आहे. संस्कृत श्लोक किंवा स्तोत्रांमधील काही ओळी ‘टी शर्ट’वर छापल्या जातात आणि हल्लीची स्मार्ट पिढी ते टी शर्ट ‘फॅशन’ म्हणून का होईना, अंगावर मिरवितात.  लहानपणापासून संस्कृत भाषेतील श्लोक, स्तोत्रे यांचे दररोज पठण केले तर जिभेला चांगले वळण लागते, शब्दोच्चार शुद्ध व स्पष्ट होतात, भाषा सुधारते हे आता भाषा अभ्यासक व तज्ज्ञांनीही मान्य केले आहे. संस्कृत भाषेचा हा ठेवा जतन आणि संवर्धन करण्याचे काम विविध संस्था, व्यक्ती आपापल्या परीने करत असतात. कल्याणच्या कमल प्रभाकर बोडस यांनीही निवृत्तीनंतर संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार आणि संस्कृत स्तोत्रे शिकविण्याचा वसा घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ते तरुण आणि मोठय़ा वयाच्या स्त्री-पुरुषांना गेल्या काही वर्षांपासून त्या संस्कृत स्तोत्रे कोणतेही मानधन किंवा शुल्क न घेता शिकविण्याचे काम करत आहेत.

कमल बोडस या माहेरच्या कमल सहस्रबुद्धे. दहावीपर्यंत (तेव्हाची अकरावी मॅट्रिक) शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पब्लिक सव्‍‌र्हिस कमिशनची परीक्षा दिली आणि महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय (नियोजन विभागाच्या अंतर्गत) विभागात त्या ‘लिपिक-टंकलेखक’ म्हणून नोकरीला लागल्या. १९९९ मध्ये त्यांनी ‘रिसर्च असिस्टंट’ म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेतली. नोकरीत असताना घर-संसार व नोकरीच्या व्यापामुळे त्यांना म्हणावे तसे वेगळे काही करता आले नव्हते. त्यामुळे निवृत्तीनंतर काहीतरी वेगळे करावे असे त्यांच्या मनात होते. बोडस यांच्या सासरी सर्व प्रकारचे ‘कुळाचार’ आहेत. त्यामुळे लग्नानंतर सासरी ते सगळे जबाबदारीने कमल बोडस यांनी केले होतेच. ही गोष्ट त्यांच्या संस्कृत शिकण्यास कारणीभूत ठरली.

Fossils of massive prehistoric snake found in Gujarat
हिंदू पुराणातील ‘वासुकी’ तो हाच का? गुजरातमध्ये सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म; का आहे हे संशोधन महत्त्वाचे?
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Central Government Launches Dekho Apna Desh People s Choice 2024 Survey
देशातलं कोणतं पर्यटनस्थळ ठरणार सर्वांत लोकप्रिय? होणार ऑनलाइन मतदान!
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

डोंबिवलीच्या वसुधा बापट यांच्याबद्दल त्यांना माहिती कळली. महिलांना संस्कृत स्तोत्रे आणि पौरोहित्य शिकविण्याचे काम त्या करत होत्या. त्यामुळे त्यांनी बापटबाईंकडे संस्कृत स्तोत्रे शिकायला जायचे ठरविले. आठवडय़ातून एकदा दर गुरुवारी एक तास त्यांची संस्कृत संथा चालायची. पौरोहित्य करण्याची आवड नसल्याने कमल बोडस यांनी तिकडे न वळता बाकीची सर्व संथा घेतली. बापटबाई यांचे शिकविणे खूप छान होते. एका वेळेस २५ ते ३० महिलांकडून त्या संस्कृत स्तोत्रे म्हणून घ्यायच्या. एक ओळ त्या सांगायच्या व त्या पाठोपाठ अन्य महिला म्हणायच्या. कोण बरोबर म्हणतोय, कोण चुकतोय याकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे. २००५ मध्ये कमल बोडस डोंबिवलीहून कल्याणला राहायला गेल्या. तेथील गृहसंकुलातील लहान मुले, शालेय विद्यार्थी यांना ‘गणपती अथर्वशीर्ष’, ‘प्रज्ञाविवर्धन स्तोत्र’ शिकवायला सुरुवात केली. हा वयोगट ८ ते १२ वर्षांपर्यंतचा होता. यातून पुढे प्रत्येक मुलाच्या आईनेही अन्य संस्कृत स्तोत्रे आम्हालाही शिकवाल का, अशी इच्छा बोडस आजींकडे व्यक्त  केली. बापटबाई यांच्याकडून आपण जे शिकलो ते पुढे इतरांपर्यंत पोहोचवावे आणि यातून संस्कृत भाषा व स्तोत्रांच्या जतन, संवर्धनात आपलाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने त्यांनी अगोदर गृहसंकुलातील महिलांना ही स्तोत्रे शिकवायला सुरुवात केली. याची सुरुवात ‘श्रीसूक्त’ या स्तोत्रापासून झाली. ज्यांना संस्कृत स्तोत्रे शिकण्याची मनापासून इच्छा आहे, अशा सर्वाना त्या आपुलकीने व तळमळीने कोणतेही शुल्क न घेता शिकवितात.

बापटबाईंकडे शिकलेल्या बोडस आजी आणि अन्य समवयस्क महिलांनी ‘केवलानंद मंडळ’ स्थापन केले आहे. यातील रजनी परचुरे व सुषमा गोरे या दोघीजणी पौरोहित्य करतात. अगदी वास्तुशांत, मंगळागौर, सत्यनारायण पूजा त्या सांगतात, तर बाकीच्या महिला ज्यांच्याकडून बोलाविणे येईल त्या घरी सप्तशती, रुद्र यांचे पाठ व अन्य स्तोत्रे पठणासाठी जातात. मंडळात १५ ते २० जणी असून मंडळाला नुकतीच १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. पंढरपूर, पुणे, दापोलीचे विठ्ठल मंदिर, वसई, विरार, बोरिवली, विलेपार्ले, चेंबूर, ठाणे, डोंबिवली, कल्याण आदी विविध ठिकाणी जाऊन या महिल विविध संस्कृत पाठ व स्तोत्रांचे पठण करतात.

दोन्ही विवाहित कन्या, पती प्रभाकर बोडस यांचे पूर्ण सहकार्य व पाठबळ त्यांना आहे. दोन्ही जावयांनाही आपल्या या कामाचे कौतुक असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात मानसिक आधार, ताकद आणि शांतता या शिकविण्यातून व संस्कृत स्तोत्र पठणातून मिळते, असे बोडस आजींचे सांगणे आहे.

कमल बोडस -९८६९७२१४५५, ०२५१२२०१८९८