चिराडपाडा शाळेतील प्रयोगशाळेची राज्यभर दखल 

प्लॅस्टिकच्या बाटल्या, रबरी नळ्या, फुटक्या काचा, लोखंडी सळ्या, वापरलेले बॅटरी सेल, निरनिराळ्या आकाराचे पाईप आदी एरवी अडगळीत अथवा भंगारात काढल्या जाणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून काहीतरी वेगळे व टिकाऊ बनवण्याच्या युक्त्या अलीकडे इंटरनेटवर सर्रास मिळतात. मात्र, भिवंडी तालुक्यातील चिराडपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अशा वस्तूंचा वापर करून विद्यार्थ्यांना वीज, ध्वनिनिर्मिती, गुरुत्वाकर्षण यांसारख्या विविध वैज्ञानिक संज्ञा, सूत्रे, संकल्पनांचे धडे दिले जात आहेत. जिल्हा परिषद शाळेचे पांडुरंग भोईर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही अभिनव प्रयोगशाळा सध्या राज्यभर कौतुकाचा विषय ठरत आहे.

हवेचा दाब, त्याचा वातावरणावर होणारा परिणाम, ध्वनिनिर्मिती, ध्वनिवहन, चुंबकीय तत्त्व, गरुत्वाकर्षण, गुरुत्वीय बल, कूपनलिकेद्वारे पाणी कसे खेचले जाते. इंजेक्शन कसे काम करते, वीजनिर्मिती कशी होते, डॉक्टरांकडे असलेला हृदयाचे ठोके मोजण्यासाठी वापरला जाणारा स्टेथोस्कोप नेमके कसे काम करतो, साध्या ट्रेनपेक्षा बुलेट ट्रेनचा वेग अधिक का असतो अशा अनेक वैज्ञानिक रहस्यांची उकल करणाऱ्या साध्या आणि सोप्या प्रयोगांचा समावेश भोईरसरांच्या या शाळेत आहे. त्यापैकी कोणतेही साहित्य बाहेरून विकत आणलेले नाही. रोजच्या व्यवहारातील वस्तूंपासून बनविलेल्या प्रयोगांद्वारे भोईर हे निरनिराळी वैज्ञानिक सूत्रे विद्यार्थ्यांना समजावितात आणि मग विद्यार्थीच त्यांच्याकडचे साहित्य जमवून तसा प्रयोग करून पाहतात.

उदाहरणच द्यायचे झाले तर ‘जितके बल लावले जाते, तितके कार्य घडते’ असा भौतिकशास्त्रातील नियम आहे. भोईर यांनी हा नियम विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी वायरिंग झाकण्यासाठी वापरली जाणारी प्लास्टिकची पट्टी आणि काही गोटय़ांचा वापर केला आहे. नदीत भोवरे कसे तयार होतात, पृष्ठभागावर भोवऱ्यांचा दाब जास्त व खाली कमी असतो, हे दाखवण्यासाठीही त्यांनी अशाच टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे. अशा प्रकारे एकूण ५५ प्रयोग भोईर यांनी तयार केले असून त्याद्वारे विद्यार्थी विज्ञानाची घोकंपट्टी करण्याऐवजी ते आत्मसात करून घेत आहेत.

पडघ्यापासून साडेचार किलोमीटर तर पिसे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिलारपाडय़ाच्या जिल्हा परिषद शाळेत आठव्या इयत्तेपर्यंत शिक्षणाची सोय आहे.

परिसरातील ११८ विद्यार्थी तिथे शिकतात. त्यातील निम्मे विद्यार्थी आदिवासी आहेत. भोईरसरांच्या या अतिशय नावीन्यपूर्ण प्रयोगशाळेमुळे एरवी कठीण समजला जाणारा विज्ञान विषय येथील विद्यार्थ्यांना सोपा वाटू लागला आहे. त्यांना त्या विषयाची गोडी लागली आहे. त्यातूनच त्यांनी शाळेच्या आवारात धरणाची प्रतिकृती साकारली आहे. धरणात पाणी कसे साचते. धरण भरल्यावर ओसंडून जाणारे पाणी कालव्यांद्वारे कसे शेतीला पुरविले जाते, हे त्यांनी गेल्या पावसाळ्यात प्रयोग करून पडताळून पाहिले.

शिक्षणाच्या वारीत समावेश

फक्त दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या पांडुरंग भोईर यांनी विज्ञान विषयाची आवड, जिज्ञासा आणि उत्सुकतेपोटी तयार केलेली ही प्रयोगशाळा पाहायला राज्यभरातून शिक्षक आणि प्राध्यापक मंडळी चिराडपाडय़ात येत आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमात या प्रयोगशाळेची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी आणि शिक्षकांना हे प्रयोग पाहता येणार आहेत.