ठाणे, वसई, नवी मुंबई पट्ट्यात ठिकठिकाणी आंदोलने

ठाणे/ वसई/ नवी मुंबई : राज्यभर लागू झालेल्या अंशत: टाळेबंदीविरोधात महामुंबई क्षेत्रातील व्यापारीवर्गातून होत असलेला विरोधाचा सूर दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. मुंबई, ठाणे, मुंब्रा, नवी मुंबई, उल्हासनगर, वसई, नायगाव या शहरांत वेगवेगळ्या ठिकाणी बुधवारी व्यापारी, दुकानदारांनी दुकाने खुली ठेवण्यासाठी आंदोलन केले. सरकारच्या निषेधाचे फलकही झळकवण्यात आले होते.

राज्यात अंशत: टाळेबंदीमध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासंदर्भाचे आदेशही राज्य सरकारने काढले होते. या आदेशांबाबत अनभिज्ञ असलेल्या व्यापाऱ्यांनी मंगळवारी दुकाने खुली केली. मात्र, पोलिसांच्या सूचनेनंतर त्यांना दुकाने बंद करावी लागली. हेच चित्र बुधवारी दिसून आले. ठाण्यातील नौपाडा आणि उल्हासनगरमध्ये सरकारविरोधात निषेधाचे फलक घेऊन व्यापारी दुकानांसमोर जमले होते. ठाण्यातील इंदिरानगर आणि मुंब्रा येथे व्यापारी जमले होते. मुंब्रा येथील गुलाबबाग परिसरात ३० ते ४० व्यापाऱ्यांचा जमाव जमला होता. आम्हाला दुकाने सुरू करू द्या, अशी विनंती हे व्यापारी करत होते. या जमावामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती. मात्र, पोलीस आणि लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर हे व्यापारी पुन्हा घरी निघून गेले. वागळे इस्टेट येथील इंदिरानगर भागातही आम आदमी पक्ष आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी सरकारविरोधात निषेध फलक घेऊन आंदोलन केले. ठाण्यातील व्यापाऱ्यांच्या एका गटाने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. ‘पालकमंत्र्यांनी येत्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे,’ असे व्यापारोद्योग महासंघाचे अध्यक्ष भावेश मारू यांनी सांगितले.

वसईमधील नायगाव पूर्वेकडे व्यापाऱ्यांनी हातात फलक घेऊन व मानवी साखळी तयार करून टाळेबंदीचा निषेध व्यक्त केला आहे.  नालासोपाऱ्यातही व्यापाऱ्यांनी ‘गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण दुकाने बंद ठेवणार नाही,’ असा पवित्रा घेतला. व्यापाऱ्यांनी पालिका कार्यालयावर धडक मोर्चाही नेला.

नवी मुंबईमध्ये वाशी, कोपरखैरणे भागांत व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.  कोपरखैरणे भागात व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र विभाग अधिकारी अशोक मडवी यांनी पोलिसांच्या मदतीने दुकाने बंद केली. त्यामुळे चिडलेल्या व्यापाऱ्यांनी घोषणाबाजी केली. वाशी सेक्टर १७ येथे मानवी साखळी करून टाळेबंदीचा निषेध केला.

पालकमंत्र्यांकडून तोडग्याचे आश्वासन

आम्ही मंगळवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी सकारात्मक चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांनी येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले आहे, असे व्यापारोद्योग महासंघाचे अध्यक्ष भावेश मारू यांनी सांगितले.