14 August 2020

News Flash

नात्यांचे बंध पोस्टामुळे घट्ट!

टाळेबंदीच्या काळात पोस्टाने राखी पाठवण्याकडे वाढता कल

संग्रहित छायाचित्र

रोशनी खोत-आशीष धनगर

करोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे वाहतुकीवर आलेल्या निर्बंधांमुळे यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी  एकमेकांपासून दूर अंतरावर राहणाऱ्या बहीणभावाची गाठभेट होणे कठीण बनले आहे. त्यामुळे आपल्या भावाला राखी पाठवण्यासाठी महिलांनी पोस्टसेवेचा आधार घेतला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा पोस्टाद्वारे राख्या पाठवण्याचे प्रमाण ८० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. पोस्ट कर्मचाऱ्यांनीही रक्षाबंधनाच्या आधीच राख्या पोहोचत्या करण्यास प्राधान्य दिले आहे.

बहिण-भावाच्या नात्यात रक्षाबंधन या दिवसाला विशेष महत्त्व आहे.  एकमेकांपासून दूर राहणारे बहीणभाऊ या दिवशी एकमेकांच्या भेटीगाठी करतात. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी सुट्टी असतानाही मुंबई, ठाणे या शहरांतील वाहतूक व्यवस्थेवर प्रवाशांचा मोठा भार असतो. यंदा मात्र हे चित्र दिसणार नाही.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा रेल्वेसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. करोनामुळे सर्वसामान्यांना लोकल प्रवास करण्यास मनाई आहे. त्यामुळे यंदाच्या सणाला राख्या पाठवण्यासाठी बहिणींनी पोस्ट सेवेचा आधार घेतला आहे. आपल्या भावाला राख्या पाठवण्यासाठी बहिणींनी सणाच्या आठवडय़ाभरापूर्वीपासूनच पोस्ट कार्यालयात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरातील पोस्ट कार्यालयांमधून यंदा राख्या पाठवण्याचे प्रमाण ८० टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती पोस्ट प्रशासनातर्फे देण्यात आली.

नागरिकांच्या घरी या सणाच्या दिवसापूर्वीच राख्या पोहोचविण्यासाठी पोस्ट प्रशासनही सज्ज असून मुंबई, ठाणे आणि उपनगरातील सर्व कार्यालयांमध्ये राख्या पोहोचविण्यास प्राधान्य दिले जात आहे. तर यंदा राख्या पाठवण्याचे प्रमाण वाढल्यामुळे उपनगरातील सर्व कार्यालये येत्या रविवारीही खुली राहणार असून सर्व पोस्टमन रविवारी काम करणार आहेत. तसेच पोस्ट सेवा आत्यावश्यक सेवेत मोडत असल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातही राख्या पोहोचविण्यात कोणत्याही अडथळा येत नसल्याची माहिती नवी मुंबईच्या विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल शोधा मधाळे यांनी दिली.

विशेष लिफाफा

राख्या पाठवण्यासाठी पोस्ट सेवेचा वापर वाढल्यामुळे भारतीय पोस्ट विभागाने यंदा रक्षाबंधनसाठी विशेष लिफाफा तयार केला आहे. आकर्षक रंगसंगतीचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या लिफाफ्याची किंमत दहा रुपये असून तो सर्वच पोस्ट कार्यालयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या लिफाफ्याला ग्राहकांची मागणी वाढली आहे. तसेच कुरिअर सेवेच्या तुलनेत स्पीड पोस्टाची सुविधा स्वस्त असल्यामुळे ग्राहकही राख्या पाठवण्यासाठी पोस्ट सेवेकडे वळल्याचे बोलले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 12:05 am

Web Title: sending rakhi by post during lockdown abn 97
Next Stories
1 रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विशेष लोकलवर उडय़ा
2 ठाण्यात करोना मृतांच्या आकडय़ांचा घोळ?
3 करोना रुग्णांचा २० हजारांचा टप्पा पार
Just Now!
X