ठाणे : वागळे इस्टेटमधील रामनगर भागात शनिवारी रात्री एका दुकानाला लागलेली भीषण आग विझविताना सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत सातजण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

जखमींमध्ये अग्निशमन दलाचे दोन जवान, शीघ्र प्रतिसाद वाहन चालक आणि चार स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. एक ते दीड तासानंतर ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

अग्निशमन दलाचे जवान शरद गणपत कदम (५६), दीपेश पेटकर (२६), शीघ्र प्रतिसाद वाहनांचे चालक प्रसाद सुतार, स्थानिक नागरिक नितीन कदम (२०), केशव सकपाळ (५५), रोहन पांढरे (२१) आणि मंगेश कदम (४०) अशी जखमींची नावे आहेत.

वागळे इस्टेट येथील रामनगरमधील रस्ता क्रमांक २८ जवळ मर्द मराठा वाहन स्पेअर पार्टचे दुकान आहे. तळ मजल्यावर हे दुकान आहे तर, वरच्या मजल्यावर एक कुटूंब राहत होते. त्या शेजारीच अजय अगावले आणि रामसिंग यादव यांचे तळ अधिक एक मजली घर आहे. शनिवारी रात्री ११ वाजता स्पेअर पार्टच्या दुकानाला आग लागली. दुकानामध्ये वाहनांना वापरण्यात येणारे तेल असल्यामुळे आगीने काही क्षणात पेट घेऊन रौद्ररूप धारण केले. दुकानाच्या वरच्या मजल्यावर आणि त्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

या घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे काम सुरू केले. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू असतानाच दुकानातील सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये सातजण जखमी झाले. त्यांना परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.