औरंगाबाद येथील वैद्य परिवारातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय कै. ल. य. वैद्य उत्कृष्ट मुद्रितशोधक पुरस्कार यंदा ठाण्यातील शकुंतला मुळ्ये यांना देण्यात आला. शकुंतला मुळ्ये सध्या मौज प्रकाशन संस्थेत मुद्रितशोधनाचे काम करतात. त्यांच्या मुद्रितशोधन कार्याचा आढावा घेणारा हा लेख..
व्याकरण हे भाषेचे चरित्र आहे, हे मानून ते निष्ठेने जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या शकुंतला मुळ्ये मूळच्या कोकणातील देवरुखच्या. त्यांचे शालेय शिक्षण तिथेच झाले. देवस्थळी, ढवळे, परांजपे, मोगरे या शिक्षकांनी त्यांच्यात विविध विषयांची आवड निर्माण केली. त्याचप्रमाणे अवसरेबाईंनी त्यांच्याकडून चांगले व्याकरण तयार करून घेतले. लहानपणापासून स्मरणशक्ती चांगली असल्याने त्यांना बौद्धिक स्पर्धेत पहिला क्रमांक मिळे.
मॅट्रिकची परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी शिक्षिकेची नोकरी पत्करली. घरची जबाबदारी असल्याने मिळेल की नोकरी करणे त्यांना आवश्यक होते. त्यांच्या आईवडिलांना साहित्याची आवड होती. शाळेत शिक्षकांमुळे त्यांना संस्कृत भाषेची गोडी निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आर्थिक परिस्थितीमुळे अभ्यासक्रमाची पुस्तके विकत घेणेही त्यांना शक्य नव्हते. मात्र तरीही जिद्दीने बाहेरून परीक्षा देत त्यांनी एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षकी पेशा पत्करला असला तरी त्यांना खरी ओढ पुस्तकांचीच होती. त्यातूनच १९९४ मध्ये प्रा. वि. म. चौगुले यांनी त्यांची मॅजेस्टिक प्रकाशन गृहात शिफारस केली. अशा रीतीने त्यांना ग्रंथ व्यवहारात काम करण्याची संधी मिळाली. मनोहर बोर्डेकर त्यावेळी मॅजेस्टिकमध्ये मुद्रितशोधनाचे काम करीत. त्यांचे काम पाहून आपणही हे काम करावे, असे त्यांना वाटू लागले. याच काळात त्यांना साहित्य संस्कृती मंडळाचे ‘आगरकर चरित्र’ हे पुस्तक मुद्रितशोधनासाठी मिळाले.
मुद्रितशोधन म्हणजे संहिता शुद्ध करणे. प्रूफ तपासणे म्हणजे फक्त ऱ्हस्व-दीर्घ तपासणे असा अनेकांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात हे एवढेच तांत्रिक काम नाही. त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. बौद्धिक, भावनिक आणि मन पूर्णपणे गुंतविणारे हे काम आहे. गाण्यात जसा शुद्ध स्वर शब्द सुरेख करतो, त्याचप्रमाणे लेखनात अचूक, अर्थवाही आणि शुद्ध शब्द हा त्या लेखनाच्या आशयाचा प्राण असतो. कारण व्याकरण हे भाषेचे चरित्र आहे. भाषेचे हे चरित्र व्याकरणकारांनी मोठय़ा कसोशीने जपले आहे. त्यासाठी अनेक नियम घालून दिले आहेत. दादोबा पांडुरंग तर्खडकर, मोरो केशव दामले, रा.शं. वाळिंबे, द.न.गोखले, यश्मिन शेख, सत्त्वशीला सामंत यांसारख्या अनेकांनी चिकाटीने परिश्रमपूर्वक नियमावल्या तयार केल्या आहेत. शकुंतला मुळ्ये तोच वारसा समर्थपणे जपत आहेत. आतापर्यंत त्यांनी मॅजेस्टिक, मौज, ग्रंथाली, मैत्रेय, पॉप्युलर अशा अनेक प्रकाशन संस्थांच्या तीनशेहून अधिक पुस्तकांचे मुद्रितशोधन केले आहे. त्याचबरोबर अनेक खाजगी पुस्तके, काही संस्थांचे वार्षिक अहवाल, चतुरंग प्रतिष्ठानची डायरी, विविध दिवाळी अंकांसाठी त्या मुद्रितशोधनाचे काम करीत आहेत.
लेखकाने मनोगतात सौजन्यपूर्ण उल्लेख केला, तरच प्रूफरीडरला महत्त्व. अन्यथा लेखक, प्रकाशक, चित्रकार यांनाच प्रसिद्धी मिळते. मात्र पुस्तकाचे कष्टपूर्वक मुद्रितशोधन करणारे उपेक्षितच राहतात, असे शकुंतला मुळ्ये यांना वाटते.
तरुण पिढीतील लेखक त्यांच्या लेखनात अनेक नव्या शब्दांचा वापर करू लागले आहेत. त्याचे त्या स्वागत करतात. बोली भाषेतील अनेक शब्दांचे अर्थच आपल्याला ठाऊक नसतात. त्यामुळे त्या शब्दांचे अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. विविध बोली भाषेतील शब्दांचे अर्थ सांगणारा एखादा शब्दकोश तयार करणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत आहे.
विनायक गोखले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shakuntala mulay proofreading work review
First published on: 24-06-2015 at 12:17 IST