महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना-भाजपचे परस्परांवर टीकास्त्र

ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दिव्यालगत असलेल्या कचराभूमीला लागलेल्या आगीमुळे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षांचा धूर निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना कोंडीत पकडण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे. ढिसाळ नियोजन आणि असुविधांचे आगार ठरलेल्या दिव्याला वाढलेल्या जागांमुळे महत्त्व आले आहे. त्यामुळे डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांप्रमाणे दिव्यात वरचष्मा राखून शिवसेनेला धोबीपछाड देण्याची रणनीती भाजप नेत्यांनी आखली आहे. कचराभूमीच्या आगीमुळे हा संघर्ष आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

स्मार्ट शहराचा डंका पिटणाऱ्या ठाणे महापालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून दिवा तसेच आसपासच्या परिसराकडे पुरते दुर्लक्ष केले. दिवा, दातिवली, डायघर तसेच या भागातील अनेक गावांमध्ये अजूनही कचरा उचलला जात नाही, तो जाळला जातो. इतकी भयावह परिस्थिती या भागात असताना आगामी निवडणुकीसाठी येथील जागा दोनवरून वाढून ११ पर्यंत पोहोचल्याने एरवी कुणाच्या खिजगणतीतही नसलेल्या या परिसराला भलतेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

साडेचार वर्षांपूर्वी या भागातील दोन प्रभागांमधून मनसेचे नगरसेवक निवडून आले होते. या दोघाही नगरसेवकांना शिवसेनेने काही महिन्यांपूर्वी गळाला लावत येथे एकहाती विजय मिळविण्याची रणनीती आखली आहे.

शिवसेनेच्या या रणनीतीला धक्का देण्यासाठी ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील भाजपच्या बडय़ा नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले असून दिव्यात या नेत्यांचे दौरे, सभा जोमात सुरू झाल्या आहेत.

राष्ट्रवादीही आक्रमक

भाजपची भूमिका केवळ फसवी असून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. इतकी वर्षे ज्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत एकत्र राहिले, त्या भाजपला दिव्याच्या प्रश्नावर आताच जाग आली का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय भोईर यांनी उपस्थित केला आहे.

आगीचे निमित्त,संघर्ष जुनाच

’ दिवा परिसर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मोडतो. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सद्यस्थितीत शिवसेनेचे आमदार करत असले तरी दिव्याला खेटूनच असलेल्या २७ गावांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार यांसारख्या नेत्यांनी २७ गावांच्या परिसरात मध्यंतरी लक्ष केंद्रित केले होते. २७ गावांचा हाच पॅटर्न दिव्यात वापरायचा आणि नागरी प्रश्नांवर शिवसेनेला खिंडीत गाठायचे अशी तयारी भाजपने सुरू केली आहे. कचराभूमीच्या प्रश्नावर थेट महापालिका मुख्यालयावर धडक देण्याचे बेतही भाजपकडून आखले जात आहेत. शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाला आव्हान देण्याची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे.

’ कचराभूमीला लागलेल्या आगीचे महापालिका प्रशासनाला सोयरसुतक नसल्याची टीका भाजपने केली आहे. रहिवासी कित्येक दिवस कचऱ्याच्या धुराचा सामना करत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांची समस्या महापालिका प्रशासन गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे १५ दिवसांत आम्ही ठाणे महापालिकेवर मोर्चा काढणार आहोत, असे येथील भाजपचे सरचिटणीस रोहिदास मुंडे यांनी सांगितले.

शिवसेनेचाही पलटवार

दिव्यातून कचराभूमीचे स्थलांतर व्हावे यासाठी शिवसेना सातत्याने प्रयत्नशील आहे, असा दावा दिव्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक रमाकांत मढवी यांनी केला. शीळलगत बंद खदानींच्या जागेवर नवी कचराभूमी तयार करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या आर्थिक तिजोरीच्या चाव्या भाजपकडे असताना त्यांनी याविषयी आरडाओरड करणे हास्यास्पद आहे, असा पलटवार त्यांनी केला. दिव्यात ठाण्याचा कचरा येत नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.