शिवसैनिकांकडून रुग्ण शोध-संपर्क मोहीम

कल्याण : शिवसेना नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील शिवसेना नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमध्ये घरोघर करोना रुग्ण शोध-संपर्क मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवकांच्या नियंत्रणाखाली होणाऱ्या या रुग्ण शोधमोहिमेत स्थानिक आरोग्य विभागाचे पथक, सेनेचे प्रशिक्षित कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी कल्याणमध्ये आले होते. ठाकरे यांनी कल्याणमध्ये धारावी पॅटर्नप्रमाणे काम सुरू करण्याची सूचना केली होती. या कामासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने आक्रमकपणे प्रशासनाला हा उपक्रम १२२ प्रभागांमध्ये राबविता येत नाही. मागील साडेतीन महिन्यांत आशा कार्यकर्त्यां, अंगणवाडी सेविका, शिक्षिका यांच्या माध्यमातून सर्वेक्षणाची कामे करण्यात आली. या कामाचे नियोजन विस्कळीत होते. त्यामुळे चांगले परिणाम दिसले नाहीत.

मिलिंदनगरमध्ये शोधमोहीम

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या आवाहनानंतर शिवसेनेचे नगरसेवक सक्रिय झाले आहेत. कल्याण पश्चिमेतील मिलिंदनगर प्रभागात स्थानिक नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांनी ३० शिवसैनिकांच्या साहाय्याने सोमवारपासून प्रभागात धारावी पॅटर्न राबविण्यास सुरुवात केली. या उपक्रमात चिकणघर आरोग्य केंद्राच्या डॉ. सीमा जाधव व त्यांचे वैद्यकीय पथक सहभागी झाले आहे. घरोघरची तपासणी करताना कार्यकर्ते रहिवाशाचा आजार, त्याची लक्षणे, पूर्वआजार, तापमान अशी माहिती गोळा करत आहेत. कार्यकर्त्यांची दोन पथके प्रभागांमध्ये घरोघर मोहीम राबवीत आहेत. दररोज किमान ८०० ते एक हजार घरांचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन आहे. प्रतिजन चाचणी केली जाणार आहे. ताप असेल तर तात्काळ औषध दिले जाणार आहे, असे नगरसेवक देवळेकर यांनी सांगितले.

शिवसेना नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रभागात धारावी पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला. दररोज एक हजार घरांचे सर्वेक्षण पालिका वैद्यकीय पथकाच्या साहाय्याने केले जाणार आहे. प्रभागातील शिवसैनिक या मोहिमेत सहभागी झालेत. अशा प्रकारे प्रत्येक प्रभागात सर्वेक्षण झाले तर नक्की करोनाची साखळी तोडणे शक्य होणार आहे.

-राजेंद्र देवळेकर, ज्येष्ठ नगरसेवक, शिवसेना

सुरक्षेचे काय?

शिवसेना नेत्यांनी घोषणा केली म्हणून धारावी पॅटर्न राबविण्यासाठी शिवसैनिक प्रभागात करोना संपर्क मोहिमेसाठी उतरले तर कार्यकर्त्यांना प्रत्येकी १३०० रुपये खर्चाचे सुरक्षा किट नगरसेवक, पालिका उपलब्ध करून देणार आहे का असा सवाल एका जुन्या शिवसेना पदाधिकाऱ्याने उपस्थित केला. तपासणी करताना एखादा कार्यकर्ता करोना सकारात्मक आला तर त्याचा खर्च नेते, नगरसेवक उचलणार आहेत का तसेच अशा वेळी त्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाला शिवसेना नेते कोणत्या प्रकारची मदत करतील याची कोणतीच शाश्वती नाही. आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर गोंजारण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे, असे या शिवसैनिकाने सांगितले.