ठाणे : एका घरगुती कार्यक्रमासाठी ठाण्यात आलेले  सरसंघचालक मोहन भागवत यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या नेत्यांची शुक्रवारी लगबग दिसून आली.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात संघाशी संबंधित मतदारांचा आकडा लक्षणीय असून नौपाडा, चरई, पाचपाखाडी या भागातील निवडणुकांमध्ये या मतदारांचा नेहमीच प्रभाव दिसून आला आहे. गेल्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये याच भागात शिवसेनेला भाजपकडून  पराभव पत्करावा लागला होता. हे समीकरण लक्षात घेऊन चरई भागात खासगी भेटीसाठी आलेल्या सरसंघचालकांच्या स्वागतासाठी शिवसेनेने  फलक लावल्याचे दिसून आले. याशिवाय या विभागातील खासदार निधीतून बांधण्यात आलेल्या टिळक पुतळ्याला या वेळी खासदार राजन विचारे यांच्या आग्रहाखातर भागवतांनी पुष्पहारही अर्पण केला.

ठाण्यात चरई भागात राहणाऱ्या जोशी कुटुंबीयांकडे भागवत आले होते. ठाणे रेल्वे स्थानकात सकाळी नागपूरहून ट्रेनने त्यांचे आगमन झाले. भागवत यांच्या ठाणे भेटीची चाहूल लागताच शिवसेनेच्या नेत्यांनी गुरुवारी रात्रीपासूनच त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. जुने ठाणे शहर हे शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला असला तरी भाजपने फारकत घेतल्यापासून या ठिकाणी शिवसेनेची पीछेहाट सुरू झाल्याचे चित्र गेल्या काही निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा ठाणे शहर मतदारसंघातून पराभव झाला होता.  महापालिका निवडणुकीत या भागातील चारही जागा शिवसेनेला गमवाव्या लागल्या होत्या.