चोख रणनीतीमुळे शिवसेनेचे विजयाचे ‘फाटक’ खुले
कोटय़वधी रुपयांच्या घोडेबाजारामुळे चर्चेत आलेल्या ठाणे-पालघर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मतांना मोठा सुरुंग लावत शिवसेनेने विजयाचे ‘डाव’खरे केल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीच्या पाठिंब्यानंतरही डावखरे यांच्याकडे विजयासाठी आवश्यक पुरेसे संख्याबळ नव्हतेच. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी पक्ष, अपक्षांसह भाजपमधील ‘राष्ट्रवादी’ नेत्यांना गळाला लावण्याची स्पष्ट रणनीती त्यांनी आखली होती. मात्र ठाणे, नवी मुंबईसारखे हक्काचे मतदार असलेल्या भागातील काही मते शिवसेनेकडे वळल्याने त्यांचे डाव पूर्णपणे चुकले आणि रवींद्र फाटक यांचा विजय सुकर झाल्याची चर्चा रंगली आहे.
ठाणे आणि पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात १०६० मतदारांपैकी १०५७ मतदारांनी शुक्रवारी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे विजयासाठी ५२८ मतांचा आकडा गाठणे आवश्यक होते. शिवसेना-भाजप युतीकडे यापैकी ५१२ मते होती. त्यामुळे या निवडणुकीत रवींद्र फाटक यांचे पारडे सुरुवातीपासून जड मानले जात होते. वसई-विरारच्या हितेंद्र ठाकूर यांनी तब्बल १२८ मतांची रसद डावखरे यांच्यामागे उभी केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीसह त्यांच्याकडे ४२१ मतांचे गणित पक्के होते. मनसे, समाजवादी, अपक्ष,डावे पक्षांचा पाठिंबा गृहीत धरून त्यांनी आणखी १०० मतांचे ठोकताळे बांधले होते. राज्यात भाजप-शिवसेना या प्रमुख पक्षांमधील सख्य सर्वश्रुत असल्याने त्याचाही फायदा आपल्याला मिळेल, असा डावखरे समर्थकांना विश्वास होता, शिवाय भाजपमय झालेले जिल्ह्य़ातील ‘राष्ट्रवादी’ नेत्यांची मदतही त्यांनी गृहीत धरली होती. अंबरनाथ, बदलापूर भागातील एका भाजप नेत्याने फाटक यांच्या उमेदवारीविषयी जाहीर नाराजी व्यक्त करून युतीमध्ये सुरुवातीला खळबळ उडवून दिली होती. कल्याण पूर्वेतील एक नव भाजपप्रेमी नेताही डावखरेंना साथ द्या, असा संदेश देत असल्याची माहिती शिवसेना नेत्यांना मिळाली होती.

शिवसेनेची रणनीती
पालघर पट्टय़ात शिवसेना-भाजपची जवळपास ७३ मते आहेत. या मतांवर हितेंद्र ठाकूर डोळा ठेवून असल्याचे लक्षात येताच शिवसेना नेते कमालीचे सावध झाले. केवळ शिवसेना-भाजपच्या ५१२ मतांपुरते थांबायचे नाही तर मिळेल ते मत पदरात पाडून घेण्याची रणनीती शिवसेना नेत्याने आखली. अंबरनाथ, बदलापूर पट्टय़ात शिवसेनेने समझोत्याचे अस्त्र बाहेर काढत तेथे सत्तेत भाजपला वाटा देण्याचे निश्चित केले. पालघर, मीरा-भाईंदर पट्टय़ात हितेंद्र ठाकूर यांचा वावर पाहता ठाण्यातून नरेश म्हस्के आणि आमदार प्रताप सरनाईक यांना तेथे लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नवी मुंबईत शिवसेना नेते विजय चौगुले आणि डावखरेंचे सख्य सर्वश्रुत आहे. चौगुलेंच्या मनातील नाराजी दूर करण्यासाठी स्वत: पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. नवी मुंबईतील राष्ट्रवादीची ६० मते गृहीत धरून चालणारे गणेश नाईक यांच्या रणनीतीलाही खिंडार पाडण्यात शिवसेनेची स्थानिक फळी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाल्याची आता चर्चा आहे. ठाणे शहर तसेच नवी मुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादीची हक्काची मते वळविण्यात यश मिळाल्याने शिवसेना नेते शुक्रवारपासूनच निर्धास्तपणे वावरताना दिसत होते.