शिवसेना-भाजप यांच्यात जुंपण्याची चिन्हे

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेने दप्तरी दाखल करण्याचा निर्णय नुकताच घेतला असून हा निर्णय जिव्हारी लागलेल्या भाजपने शिवसेनेवर थेट निशाणा साधला आहे. एकीकडे केंद्र सरकारकडे मदत मागायची आणि केंद्र सरकारच्या प्रकल्पांना मोठय़ा अविर्भावात परवानगी नाकारायची या प्रकारातून शिवसेना नेत्यांचे ढिसाळ धोरण स्पष्ट होत असल्याची टीका भाजपचे आमदार व शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली आहे. तसेच बुलेट ट्रेनला विरोध म्हणजे ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या अकलेचे दिवाळे निघाले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. यामुळे सेना-भाजपमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएचएसआरसीएल) माध्यमातून प्रकल्पासाठी जागा हस्तांतराची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये महापालिकेच्या मालकीची शिळ भागातील जागा बाधित होणार आहे. ही जागा देण्यासंबंधीचा प्रस्ताव गेल्या दीड वर्षांपासून सत्ताधारी शिवसेनेने रोखून धरला होता. अखेर काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव सेनेने दप्तरी दाखल करण्याचा निर्णय घेतला. या सभेत भाजपने मौन बाळगले असले तरी हा निर्णय भाजपच्या जिव्हारी लागला आहे. यातूनच भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधला आहे.

एकीकडे मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचे आरे कारशेडमधील सुरू असलेले काम थांबवून नव्या कारशेडचा अट्टाहास करायचा, तर दुसरीकडे ठाण्यात बुलेट प्रकल्पासाठी जागा नाकारायची. मात्र, ठाण्यातील बससेवेसाठी केंद्र सरकारकडे निधी मागायचा, अशा उलटसुलट कसरती केवळ शिवसेनाच करू शकते. सध्या विरोधासाठी विरोध हा एकमेव कार्यक्रम शिवसेनेपुढे दिसत आहे. विकास प्रकल्पांना विरोध करून आपण मुंबई-ठाण्याला कोठे नेत आहोत, याचे शिवसेनेच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

‘१९६ कोटींच्या निधीचे काय झाले?’

स्मार्ट सिटी योजनेसाठी केंद्र सरकारने ठाणे महापालिकेला १९६ कोटी रुपये निधी दिला. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, सध्या स्मार्ट सिटी प्रकल्पांची स्थिती काय आहे, याविषयी शिवसेनेने उत्तर द्यावे. हा पैसा कसा वाया गेला, याची माहिती सामान्य जनतेला देण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान डावखरे यांनी केले. महापालिकेतील वेबिनार सर्वसाधारण सभेत भाजपाला विरोध करण्याची संधीही न देता प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला. मात्र, त्याबाबत प्रसारमाध्यमांपुढे खोटी बतावणी करून शिवसेना काय साध्य करीत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.