सिंधी कॉलनी, कोपरी, ठाणे (पूर्व)

impact of us foreign policy on semiconductor industry
चिप-चरित्र : चिप उद्योगाचे ‘पूर्व’रंग
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र

एकत्र कुटुंब पद्धती आणि चाळ संस्कृतीचा ऱ्हास हे महानगरी संस्कृतीचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. ठाणे शहरही त्याला अपवाद नाही. एक-दोन मजली चाळी, बहुमजली अपार्टमेंट आणि आता आकाशाला गवसणी घालणारे टॉवर्स अशा पद्धतीने येथील गृहरचना बदलत गेलेली दिसते. मात्र तरीही अजूनही अर्ध शतकापूर्वीच्या टुमदार शहराच्या खुणा शहरात आहेत.

पूर्वेकडची सिंधी कॉलनी त्यापैकी एक. या वसाहतीला थेट देशाच्या फाळणीचा संदर्भ आहे. फाळणीनंतर भारतात आलेल्या सिंधी निर्वासितांची सोय तत्कालीन कल्याण तालुक्यातील लष्कराच्या बराकींमध्ये करण्यात आली. त्यातूनच उल्हासनगर  हे सिंधीबहुल शहर वसले. त्याच वेळी काही सिंधी कुटुंबियांना ठाणे शहराच्या पूर्व विभागात जागा देण्यात आली. कोपरी भागात केंद्र सरकारच्या २५ इमारतींमध्ये राहण्यासाठी जागा देण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडून प्रती घरटी ७५० रुपये घेतले गेले. आता ५५ वर्षांनंतर या इमारती जीर्ण झाल्या आहेत. धोकादायक ठरल्या आहेत. महापालिका प्रशासनानेही या इमारती धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत. मात्र आता या इमारती केंद्र शासनाच्या ताब्यात असल्याने त्यांचा पुनर्विकास करता येत नाही. या चाळसदृश्य इमारतींचे सज्जे कोसळले आहेत. छताचे प्लॅस्टरही कधीही कोसळेल अशा अवस्थेत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीयांना येथील घरांना टाळे लावून अन्यत्र आसरा घेतला आहे. सध्या इथे फक्त ३० ते ४० टक्केच सिंधी नागरिक राहतात. इमारतींचा पुनर्विकास व्हावा म्हणून येथील रहिवासी गेली अनेक वर्षे शासनदरबारी पाठपुरावा करीत आहेत. राजकीय नेत्यांनी यासंदर्भात त्यांना अनेक आश्वासने दिली. मात्र अद्याप या प्रश्नाचे भिजत घोंगडे कायम आहे. सिंधी असोसिएशनतर्फे यासंदर्भात उच्च न्यायालयातही दाद मागण्यात आली आहे.

असुविधा आणि दुर्दशेचा फेरा

छत गळत असल्याने पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरते. या वसाहतीत मलनि:सारणाची नीट व्यवस्था नाही. त्यामुळे सांडपाणी तुंबून दरुगधी पसरते. विशेषत: पावसाळ्यात रहिवाशांचे हाल होतात. कॉलनीजवळच परिसरातील रहिवासी त्यांची वाहने अवैधरित्या पार्क करून ठेवतात. त्यामुळे ‘असुनि खास मालक घरचा..’ अशी सिंधी कॉलनीतील रहिवाशांची अवस्था असते. कोपरीवासीयांना अधिकृत मंडई नाही. त्यामुळे येथे रस्त्यांवरच बाजार भरतो. कॉलनीतील काही रहिवाशांनी अनधिकृतपणे आपापल्या घरांचे क्षेत्रफळ वाढविले आहेत. सांडपाण्याचा योग्यप्रकारे निचरा होत नसल्याने येथे डासांचा त्रास आहे.   कॉलनीत झुलेलाल मंदिर आणि गुरूद्वारा आहे. या दोन प्रार्थनास्थळी सर्वजण एकत्र येऊन आपले पारंपरिक पद्धतीचे सण साजरे करतात. येथे सिंधी महोत्सवही भरविला जातो. त्यामध्ये खास सिंधी कलांचे सादरीकरण होते.

सिंधी समाजातील काहीजणांची कोपरी परिसरात मोठी दुकाने आहेत. या परिसरात संध्याकाळी  खाण्याच्या दुकानांमध्ये खाऊगल्ली म्हणून हा परिसर लोकप्रिय आहे. येथे चन्ना पॅटिस, समोसे, भेळ, लस्सी, खिमा-पाव आदी पदार्थाना अधिक मागणी असल्याचे येथील दुकानदारांनी सांगितले. सिंधी कॉलनी रस्त्यालगतच आहे. त्यामुळे तिथे कायम वर्दळ असते. त्यामुळे एखादी धोकादायक इमारत कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याचा धोका संभवतो.

लोकप्रतिनिधी आणि शासनाने तातडीने लक्ष घालून या कॉलनीच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी कळकळीची विनंती येथील रहिवाशांनी केली आहे.