रिक्षाचालकांच्या मुजोरीला लगाम बसावा आणि महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा, याकरिता रिक्षांकरिता ‘स्मार्ट कार्ड’ योजना सक्तीची करावी, अशी मागणी आता लोकप्रतिनिधीकडून होऊ लागली असून या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. तसेच बेकायदा रिक्षांविरोधात ठोस उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
ठाण्यातील स्वप्नाली लाड या तरुणीच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगाला सहा महिने उलटत नाहीत तोच पुन्हा अशाच प्रकारची घटना रविवारी घडली. चालकापासून बचाव करण्यासाठी दोन तरुणींनी धावत्या रिक्षातून उडी मारली. या घटनेमुळे महिलांसाठी रिक्षाचा प्रवास असुरक्षित असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. महिलांच्या सुरक्षेकरिता वाहतूक पोलिसांनी ‘स्मार्ट कार्ड’ योजना आणली असून या योजनेकरिता २२ हजार रिक्षांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १७ हजार रिक्षांमध्ये स्मार्ट कार्ड बसविण्यात आले आहेत.
उर्वरित रिक्षांमध्ये बसविण्याचे काम सुरू आहे. असे असले तरी ठाणे शहरातमध्ये प्रत्यक्षात सुमारे ५० हजार रिक्षा धावत असून त्यामध्ये बोगस रिक्षांची संख्या मोठी आहे. स्मार्ट कार्ड योजना सक्तीची नसल्यामुळे अनेक रिक्षाचालक त्यास असहकार दाखवीत आहेत.
 तसेच रिक्षाचालकांची मुजोरी आणि महिलांची सुरक्षा हा केवळ ठाण्याचा प्रश्न राहिलेला नसून सर्वच ठिकाणी अशीच अवस्था आहे. यामुळे रिक्षांमध्ये स्मार्ट कार्ड योजना सक्तीची करावी, अशी मागणी ठाणे शहरचे आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.