News Flash

दया क्षमा शांती तिथे माहेरची वस्ती

ठाण्यात राहणाऱ्या स्टेट बँकेतील कर्मचाऱ्यांची आमची पहिली सोसायटी.

ठाण्यातील आमच्या ‘दया क्षमा शांती’ सोसायटीचा पुनर्विकास होणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पोहोचली. बोरिवलीला राहणाऱ्या माझ्या बालमैत्रिणीने- प्रतिभाने लगेच मला फोन केला. आम्ही दोघीही सोसायटीतल्या आठवणींमध्ये रमून गेलो. आता आमच्या इमारतीच्या जागी १७ मजली टॉवर होणार याचा आनंद आहेच, मात्र जुन्या इमारतीशी निगडित आठवणी पुसल्या जाणार याबाबत थोडी हुरहुरही वाटत होती. मन नकळतपणे ४५ वर्षे मागे गेले.

ठाण्यात राहणाऱ्या  स्टेट बँकेतील कर्मचाऱ्यांची आमची पहिली सोसायटी. १९६५ मध्ये ही सोसायटी स्थापन झाली. त्या वेळी आजूबाजूला मोकळी जागा होती. एकूण ४० सदनिका. त्यातले ९० टक्के गिरगाव, लालबाग, परळ आदी भागांतल्या चाळींमधून आलेले. शेजारधर्माची सवय असल्याने ब्लॉकच्या बंदिस्त चौकटीत करमत नव्हते. पुन्हा हा परिसर तेव्हा निर्जन होता. त्यामुळे मुंबईच्या आठवणींनी अनेकांच्या डोळ्यांत पाणी येई. मात्र स्टेट बँकेचा समान दुवा आणि प्रत्येकाच्या मनात असलेले चाळीतले संस्कार यामुळे या नव्या ठिकाणी हळूहळू का होईना आम्ही रमू लागलो. योगायोग म्हणजे आम्ही बच्चे कंपनींमध्ये मुलींची बहुसंख्या होती. शाळेच्या वेळा सोडून आम्ही साऱ्या जणी कुणाच्या ना कुणाच्या घरी जाऊन धुडगूस घालत असू. जी. व्ही. जोशी म्हणजे आमच्या अप्पांच्या घरी पत्ते, सागरगोटे, भातुकलीचे खेळ रंगू लागले. मौजमजा, मस्ती, दंगा, भांडण यांमुळे दया क्षमा शांती अक्षरश: नांदती असायची.

इमारतीजवळ प्रशस्त मैदान होते. मोठी मुले तिथे व्हॉॅलीबॉल खेळत. या खेळात आमच्या बर्वेवहिनी तरबेज होत्या, पुरुषांपेक्षाही अधिक चपळाईने त्या चेंडू परतवायच्या. आम्ही लहान मुले सोनसाखळी, आबाधुबी, विटीदांडू, लपाछपी आदी खेळ खेळायचो. अगदी आजी-आजोबांपासून नातवंडांपर्यंत आमची ‘दया क्षमा शांती’ म्हणजे एक मोठे कुटुंबच होते. आम्ही सर्व सण-उत्सव अगदी दणक्यात साजरे करायचो. त्यातून लहान मुलांवर आपोआपच संस्कार व्हायचे. त्यासाठी वेगळ्या वर्गात घालण्याची गरजच नव्हती. कोणत्याही समस्या चार भिंतींपुरती मर्यादित राहायची नाही. त्यावर सर्व मिळून उपाय काढत असत.   सोसायटीत आणखी एक अलिखित नियम होता. सर्व ब्लॉक एकसारखे होते. त्यामुळे कुणी ब्लॉक विकून दुसरीकडे जाणार असेल तर प्रथम सोसायटीतल्या सदस्यांना तो बदलून दिला जायचा. परस्पर सामंजस्याने हे सर्व होत होते.

आता इमारत पाडून टॉवर होणार म्हटल्यावर या सर्व आठवणींना उजाळा मिळाला. एकमेकींचे फोन येऊ लागले. त्यातून सोसायटीतील लेकी-सुनांचा मेळावा भरविण्याची कल्पना पुढे आली. प्रतिभा, मी, सुषमा, मृदुल, लतिका आदींनी मिळून छान बेत आखला. सर्व सहमतीने २९ नोव्हेंबर हा दिवस ठरला. त्या दिवशी सोसायटीत २५ लेकी-सुना जमल्या. सुनांनी आमची (लेकींची) सरबराई करायची अशी प्रेमळ अट आम्ही घातलीच होती. आम्ही एकमेकींना औक्षण केलं. त्यानंतर गप्पांची मैफल सुरू झाली. पन्नाशीच्या, साठीच्या चाळिशीचे माप ओलांडून अगदी ‘तरुण’ झाल्या. हास्य-विनोद, थट्टा-मस्करी केली जाऊ लागली. सोसायटीची पाण्याची टाकी हा आमचा त्या वेळचा अड्डा होता. आता त्याला कट्टा म्हणू या फार तर. तिथे एकमेकांची ख्याली-खुशाली क्वचित कधी तरी उणीदुणीही काढली जायची. गप्पांच्या ओघात मी अहमदनगरमधील डॉ. राजेंद्र धामणे आणि डॉ. सुचेता धामणे यांनी बेघर, अनाथ मनोरुग्ण महिलांसाठी सुरू केलेल्या माऊली सेवा प्रतिष्ठान या संस्थेची माहिती दिली. त्याबरोबर प्रत्येकीने या भेटीची आठवण म्हणून यथाशक्ती या संस्थेला देणगी देण्याचा निर्णय उत्स्फूर्तपणे घेतला. त्यातून ३६ हजार रुपये जमले.

उज्वलाने दिवसभराच्या पोटापाण्याची व्यवस्था केली होती.दुपारी कडक-मिठी चाय घेऊन आम्ही पुन्हा एकेक करून काही तासांची भूतकाळाची सफर पूर्ण करून वर्तमानात परतू लागलो. अशा प्रकारचे स्नेहसंमेलन पुरुषपात्रविरहित भरविल्याची एक प्रेमळ तक्रार आली. पुढच्या वेळी त्याची दखल घेण्याचे ठरले. नव्या टॉवरचे नाव दया क्षमा शांतीच ठेवावे, अशी आम्ही सर्व जुन्या मंडळींची इच्छा आणि प्रेमाची विनंती आहे. पाहू या काय होतेय ते..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2016 1:31 am

Web Title: some memory of daya kshama shanti tower in thane
टॅग : Thane
Next Stories
1 गेल्या विहिरी कुणीकडे?
2 प्रवाशांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
3 निवृत्तीवेतनासाठी ज्येष्ठांची परवड
Just Now!
X