कलागुणांना वाव देण्यासाठी बालदिनानिमित्त विशेष कार्यक्रम

बालदिनानिमित्त ‘आचार्य अत्रे कट्टय़ावर’ ठाण्यातील सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. येथील विद्यार्थ्यांनी लाकूडतोडय़ाची गोष्ट सादर करून त्यांच्यातील अभिनय कला उपस्थितांसमोर सादर केली. तसेच ‘बम बम बोले’, ‘मन रानात गेलं गं’, ‘इतनी सी हसी’सारख्या गाण्यांवर नृत्य सादर करून सर्वाची मने जिंकली. तसेच येथील मोहन काळे या विद्यार्थ्यांच्या ‘मिळणार नाही पुन्हा आई-बापाची माया’ या गाण्यांने उपस्थितांचे मन हेलावले. तसेच यावेळी सिग्नल शाळा या संकल्पनेशी संबधितांच्या मुलाखतींचेही आयोजन केले होते. यावेळी उपस्थित महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी ‘सिग्नल शाळा’ या संकल्पनेविषयी सर्वाना माहिती दिली.

[jwplayer zkvFlBpu]

भारतासारख्या महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशात आजही लाखो लोक रस्त्यावर जगत असून त्याच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आजही अधांतरित आहे, असे प्रतिपादन समर्थ भारत व्यासपीठ संस्थेचे भटू सावंत यांनी केले. आर्थिक असमतोलामुळे भारतावर ही परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘समर्थ भारत व्यासपीठा’च्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांना सर्वसामान्यांचे आयुष्य देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. सिग्नल शाळेच्या माध्यमातून या रस्त्यांवरील मुलांना जीवन जगण्यासाठीचे मूल्यशिक्षण देणे, हा यामागचा मुख्य हेतू आहे.

सिग्नल शाळेच्या पहिल्याच दिवसांपासून या मुलांमध्ये झालेला आमूलाग्र बदलांचे विविध किस्से, आरती नेमाणे यांनी यावेळी कट्टेकऱ्यांना सांगितले.

सहा महिन्यांपूर्वी रस्त्यावर राहणारी भटकंती करणाऱ्या मुलांनी शाळेत प्रवेश केला. त्यांच्या शारीरिक, बौद्धिक गरजांना प्राधान्य देऊन त्यांच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, आम्हाला यात नक्की यश मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. महापालिकेच्या माध्यमातून या शाळेच्या शैक्षिणिक गरजांची पूर्तता होत असली तरीही या मुलांच्या इतर गरजांसाठी लागणारा निधी हा लोकनिधी गोळा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

[jwplayer izOWW4O7]