ठाणे : संवेद व्यवहार च्या १९३ धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर ठाण्याच्या मुंबई क्रीकेट अकादमी संघाने ऑल स्टार्स क्रिकेट क्लबचा २४ धावांनी पराभव करत ऑल स्टार्स क्रीकेट फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित १६ वर्षांखालील मास्टरब्लास्टर ढाल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
आझाद मैदानावर झालेल्या दोन दिवसांच्या अंतिम सामन्यात संवेदच्या (४७ चेंडूत ६२) अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई क्रिकेट अकादमीने पहिल्या डावात १४६ धावा केल्या. ऑल स्टार्स Rिकेट क्लबच्या शार्दूल पालांडे आणि वेदांत हरिदासने प्रत्येकी तीन विकेट्स मिळवल्या. त्यानंतर अद्वैत भावे (५९), अभिषेक कुमावत (४७) आणि ओंकार मोरेच्या (३२) धावांच्या खेळीच्या जोरावर ऑल स्टार्स क्रीकेट क्लबने २३० धावा करत पहिल्या डावात प्रतिस्पर्धी संघावर ८४ धावांची आघाडी मिळवली.
दुसऱ्या डावात संवेदच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे मुंबई क्रिकेट अकादमीने ४० षटकांमध्ये ३१९ धावांचा डोंगर उभा केला. संवेदने ३२ चौकार आणि एक षटकार आतषबाजी करत ११२ चेंडूत १९३ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. अजय पांडेने ४७ धावांची खेळी केली. पहिल्या डावातील आघाडी सोडल्यास विजयाच्या २३५ धावांचा पाठलाग करताना ऑल स्टार्स क्रिकेट क्लबचा दुसरा डाव २११ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावातही अद्वैतने ६५ आणि अभिषेकने ४४ धावा केल्या. विजयी संघाच्या कुणाल नवरंगेने ४७ धावांमध्ये ५, संकर्षण जोशीने ३ आणि जय गांगुर्डेने २ विकेट्स मिळवल्या. संवेदला सर्वोत्तम फलंदाज आणि सामनावीराचा पुरस्कार, कुणालला सर्वोत्तम गोलंदाज, पार्थ नवगुंडला सर्वोत्तम यष्टीरक्षक, अदवैत भावे अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार मिळाला. दिपक सावळे- पाटील आणि मुकुंद गोवावळेंचे मार्गदर्शन लाभले.

तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुल प्रथम
प्रतिनिधी, ठाणे</strong>
ठाणे येथे झालेल्या तिसऱ्या जिल्हास्तरीय टाइल्स ब्रेकिंग तायक्वांदो चॅम्पियनशिप २०१६ या स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील खेळाडूंनी १८ पदके मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे क्रीडा संकुलास प्रथम पारितोषिक मिळवून दिले. अवनीश आठवले, काव्य झाला, अथर्व नारखेडे, निधी घाणेकर, ओवी वालावलकर हे विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. कुशल चोरडिया, तनय फेंगडे, आरुष नारखेडे, विवेक ढमढेरे, त्रीशा मालदे, गौरव खाडे यांनी रौप्यपदक पटकाविले आहे. मयूर जाधव, साहिल भालेराव, श्रेयस महाजन, आर्यन शिंदे, नीलेश बापट, हृषिकेश लोलगे, जय केसकर या विद्यार्थ्यांनी कांस्यपदकाची लयलूट केली. गतवर्षी तिसरा क्रमांक पटकाविलेल्या या विद्यार्थ्यांनी दिलीप मालुसरे व विनीत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली आहे.

हॅण्डबॉल स्पर्धेत निर्मल इंग्लिश शाळेचे यश
प्रशांत घोडविंदे , युवा वार्ताहर
मॅजिक बस इंडिया फाउंडेशनतर्फे आयोजित हॅण्डबॉल स्पर्धेत कल्याण तालुक्यातील निर्मल इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बिरवाडी संघावर ६-४ असा विजय मिळवत दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत कुंदा वडवली संघाचा १२-९ आणि ६-५ असा पराभव करत शाळेने अंतिम फेरीत प्रवेश केला. आंबेगावच्या विद्यार्थ्यांचा ६-४ असा पराभव केला.

लांबउडीमध्ये श्रध्दा घुले हिला रौप्य
ठाणे, प्रतिनिधी
गुवाहाटी येथे पार पडलेल्या साऊथ आशियन गेम्समध्ये श्रध्दा घुले हिने ६.१९ मिटर लांब उडी मारून रौप्य पदक पटकाविले. या आधी श्रध्दा हिने छोटय़ा गटातून दोनदा सहभाग घेतल होता. तर मोठय़ा गटात ती प्रथमच सहभागी झाली होती. ठाणे जिल्ह्य़ातील मोठय़ा गटात रौप्य पदक मिळवणारी श्रध्दा ही पहिलीच मुलगी आहे. त्रिवंद्रम येथील काही शिक्षकांकडून तीन आठवडे प्रशिक्षण घेतल्याचे तीने सांगितले.
श्री बालाजी चॅम्पियन संघाला वाडा प्रीमियम लीगचे विजेतेपद
ठाणे: वाडय़ातील जगताप मैदान येथे गेल्या नऊ दिवसांपासून चालू असलेल्या वाडा प्रीमियर लीगच्या विजेतेपदाला अखेर श्री बालाजी चॅम्पियन संघाने गवसणी घातली. तर वाडा स्ट्रायकर या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असून, एसपी चॅम्पियन संघाने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. सावरखेडा एक्स्प्रेस या नावाने संबोधल्या जाणाऱ्या धावपटू कविता राऊत, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला. अंतिम सामनावीर म्हणून निखिल बागुल याला गौरविण्यात आले. तर मालिकावीर म्हणून टीव्हीएस स्पोर्ट्स बाईक श्री बालाजी संघाचा अष्टपैलू खेळाडू पापा शेख याची निवड झाली. हर्षद मेमन हा स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरला.

बास्केटबॉल स्पर्धेसाठी सिंघानिया शाळेच्या विद्यार्थ्यांची निवड
ठाणे: सुलोचनादेवी सिंघानिया शाळेच्या खेळाडूंची ज्युनियर एनबीए बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत नकुल शाह, धनश्री वाघमारे, दिशा बिरला, या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. शाळेचे प्रशिक्षक स्वप्निल शेट्टी, शुभांगी लोखंडे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका रेवती श्रीनिवासन यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे.